कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात

 कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात 




कोल्हापूर ६ सिटी न्यूज नेटवर्क 

 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर आगारात अत्याधुनिक ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण आज नियोजन समितीचे अध्यक्ष व कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.



या कार्यक्रमास कोल्हापूर विभागाचे यंत्र अभियंता (चालन) श्री. अनंत कुलकर्णी, वाहतूक अधिकारी श्री. अनिल मेहतर, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. भानुदास मदने, कर्मचारी अधिकारी श्री. अतुल मोरे, आगार व्यवस्थापक श्री. गणेश कोळी, श्री. प्रमोद तेलवेकर, स्थानक प्रमुख श्री. मल्लेश विभुते, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री. विजय निगडे, वाहतूक निरीक्षक श्री. राज कारेकर व श्री. रोहित मातले, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. दीपक घारगे, वाहतूक नियंत्रक श्री. इफ्रान सांगावकर, श्री. राकेश कांबळे तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात ‘ई-शिवाई’ बस सेवेचे विविध फायदे उपस्थितांसमोर मांडले. इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी, सुरक्षित, प्रदूषणमुक्त व सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या बसमुळे इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


आजच्या शिवराज्याभिषेक दिनाचा संदर्भ देत तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘ई-शिवाई’ ही हरितक्रांतीची दिशा दर्शविणारी बस असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. पर्यावरणपूरक वाहतुकीचा स्वीकार करून नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


कार्यक्रमाच्या शेवटी आमदार क्षीरसागर यांनी ‘ई-शिवाई’ बस सेवेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत सर्व प्रवासी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कोल्हापूर विभागाच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत या नवीन इलेक्ट्रिक बसमुळे आधुनिकता, पर्यावरण संवर्धन आणि प्रवासी सुविधा यांचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments