बळीराजा, साखर उद्योगाच्या प्रश्नांसाठी २१ जूनपासून चुये येथे माणिक पाटील-चुयेकर यांचे बेमुदत अन्यत्याग आंदोलन

 बळीराजा, साखर उद्योगाच्या प्रश्नांसाठी २१ जूनपासून चुये येथे माणिक पाटील-चुयेकर यांचे बेमुदत अन्यत्याग आंदोलन



कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 

 ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदारी आणि ग्राहकांच्या हितासाठी विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पदवीधर मित्रचे संस्थापक-अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर हे रविवार, दि. २१ जूनपासून चुये (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदिर परिसरात बेमुदत अन्यत्याग आंदोलन करणार आहेत. यासंदर्भात बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.

यावेळी किसान मोर्चाचे भगवान काटे यांनी, "शेतकऱ्यांचे मरण हे सरकारचे धोरण बनले आहे," अशी टीका करत शेतकरी आणि साखर उद्योगासमोरील गंभीर प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. साखर तज्ज्ञांशी चर्चा करूनच या आंदोलनाची भूमिका निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

माणिक पाटील-चुयेकर म्हणाले, विधानमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे. को-जनरेशनमधून उत्पादित होणाऱ्या विजेच्या दरातील कपात, साखरेचे कमी दर तसेच साखरेपासून तयार होणाऱ्या उपपदार्थांना योग्य भाव मिळत नसल्याने साखर उद्योग अडचणीत आला आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत असून कृषी उद्योग संकटात सापडू नये यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

शेतकरी, साखर कारखाने आणि ग्राहक या तिन्ही घटकांच्या हितासाठी आपण समन्वयाची भूमिका घेत असल्याचे सांगत चुयेकर यांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये एफआरपीमध्ये ८५० रुपयांची वाढ करणे, पूर्वीप्रमाणे रेशन दुकानांमधून साखरेचे वितरण सुरू करणे अथवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अनुदान देणे, साखर निर्यातीवरील निर्बंध कायम ठेवणे, इंधनामधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविणे आणि या विषयावर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन त्याची तारीख जाहीर करणे यांचा समावेश आहे.

या मागण्या व्यवहार्य असून शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताच्या असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी हे प्रश्न अधिवेशनात मांडून शासनावर दबाव आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.

शासनाकडून सकारात्मक शब्द आणि बैठकीची तारीख मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याचेही सांगण्यात आले.


पत्रकार परिषदेला सदाशिव कुलकर्णी, ज्ञानदेव पाटील, डॉ. रवींद्र मोरे मुकुंद पाटील, हेमंत बापू पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments