कोल्हापुरात ६ जूनला ‘शिवाजी कोण होता?’चे भव्य सामूहिक वाचन

 

कोल्हापुरात ६ जूनला ‘शिवाजी कोण होता?’चे भव्य सामूहिक वाचन



शिवराज्याभिषेक दिनी पाच हजार सजग वाचकांचा सहभाग 

कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क 

अनुसूचित जाती (एससी) आरक्षण बचाव जनआंदोलन समिती, कोल्हापूर जिल्हा आणि विविध परिवर्तनवादी, आंबेडकरी, पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शनिवार, ६ जून रोजी दुपारी ४ वाजता बिंदू चौक येथे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे भव्य सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात विविध जाती-धर्म, विचार आणि सामाजिक स्तरातील तब्बल पाच हजार सजग वाचक सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.



आयोजकांनी सांगितले की, ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील मूलभूत विचार, सामाजिक सलोखा, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार समाजापर्यंत पोहोचविणे हा या सामूहिक वाचनामागील प्रमुख उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा चिकित्सक आणि लोकाभिमुख दृष्टिकोन समाजापुढे यावा, इतिहासाकडे तर्कशुद्ध व समतावादी नजरेतून पाहण्याची प्रेरणा मिळावी आणि समाजात वाढत असलेल्या द्वेषमूलक वातावरणाला वैचारिक उत्तर मिळावे, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अलीकडेच या पुस्तकावरून राज्यात वाद निर्माण झाला होता. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकातील काही मजकुरावर आक्षेप घेत त्याविरोधात भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर पुस्तकाविषयी व्यापक चर्चा सुरू झाली असून, कोणत्याही साहित्यकृतीचे मूल्यमापन वाचनातून आणि विचारमंथनातूनच व्हावे, अशी भूमिका आयोजकांनी मांडली. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनी सामूहिक वाचनाचा हा उपक्रम अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी, धर्मनिरपेक्ष आणि प्रजाहितदक्ष विचार सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचविण्याचे काम या पुस्तकाने केल्याचे आयोजकांचे मत आहे.

या उपक्रमात अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समितीसह मानवतावादी सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते, पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी, मार्क्सवादी तसेच स्त्रीवादी विचारांच्या विविध संस्था, संघटना आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

पत्रकार परिषदेला  उत्तम कांबळे, नगरसेवक दुर्वास (बापू) कदम, सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, सोमनाथ घोडेराव, सुभाष रामुगडे, रघुनाथ मांढरे, अनिल म्हमाणे, रमेश कांबळे, भीमराव कांबळे, बी. आर. कांबळे, दीपक कांबळे, प्रा. वसंत चांदूरकर, महादेव कोळी आणि पार्थ पोळके उपस्थित होते.

आयोजकांनी कोल्हापूरकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक वाचनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. समाजात बंधुता, समता आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments