रवींद्र माणगावे यांच्या "एकता पॅनेल"चा दणदणीत विजय
- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स निवडणूक २०२६-२८
- वरिष्ठ उपाध्यक्षपदी करुणाकर शेट्टी : पाश्चिम महाराष्ट्र विभाग-2 मधून संजय शेटे
मुंबई, दि. १६ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील संपूर्ण उद्योग आणि व्यापार जगताचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) 2026-28 च्या निवडणुकीमध्ये सभासदांनी स्थैर्य, अनुभव आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रभारी अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या नेतृत्वाखालील "एकता पॅनेल"ला भरघोस मतांनी निवडून दिले.
11 ते 13 जून दरम्यान राज्यभरातील विविध मतदान केंद्रांवर उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. तर 15 जून रोजी मतमोजणी झाली. यानंतर निकाल जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र चेंबरचे प्रभारी अध्यक्ष रविंद्र माणगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र चेंबरच्या नेतृत्वाची धुरा माणगावे यांच्या खांद्यावर सोपवून सभासदांनी त्यांच्या कार्यशैलीवर आणि दूरदृष्टीवर विश्वासाची मोहोर उमटवली आहे.
या निवडणुकीत ‘एकता पॅनेल’ (रोड रोलर) आणि ‘प्रगती पॅनेल’ (विमान) यांच्यात चुरशीची लढत झाली. मागील महिनाभर राज्यभर झालेल्या सभासद संपर्क मोहिमा, बैठका, प्रचार उपक्रम आणि संवाद कार्यक्रमांमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगले होते.
वरिष्ठ उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकता पॅनेलचे करुणाकर शेट्टी यांनी प्रगती पॅनेलच्या संगीता पाटील यांचा तब्बल 1,785 मतांनी पराभव करत दणदणीत विजय संपादन केला.
उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्येही एकता पॅनेलला उल्लेखनीय यश मिळाले. उत्तर महाराष्ट्र एक विभागातून सुनिता फाल्गुने यांनी रतन पडवळ यांच्यावर विजय मिळविला. कोकण विभागात संतोष राणे यांनी भालचंद्र राऊत यांचा पराभव करून विजयाची नोंद केली.
उत्तर महाराष्ट्र विभाग दोन मधून नितीन इंगळे यांचा पराभव करत महेंद्र (कैलास) अगरवाल विजयी झाले.
दरम्यान, मुंबई विभाग-1 मधून डॉ. धनश्री हरदास, मुंबई विभाग-2 मधून किरण भोसले, पश्चिम महाराष्ट्र विभाग-1 मधून सर्जेराव नलावडे, पश्चिम महाराष्ट्र विभाग-2 मधून संजय शेटे, मराठवाडा विभागातून संजय किर्दक आणि विदर्भ विभागातून सिद्धार्थ रुहाटिया यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांच्या निवड प्रक्रियेतही सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. मुख्य निवडणूक अधिकारी तथा सर कार्यवाह सुरेश घोरपडे यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. स्क्रुटिनी कमिटीचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व सह-अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल तसेच ग्रीव्हन्स कमिटीचे अध्यक्ष आशिष पेडणेकर व सह-अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनीही निवडणूक प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली.

Comments
Post a Comment