पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नवोदित विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास शहीद महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात

 पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नवोदित विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास

शहीद महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात




कोल्हापूर (तिटवे) ०९ सिटी न्यूज नेटवर्क 


शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित सात दिवसीय इंडक्शन प्रोग्राम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थिनींना महाविद्यालयीन जीवनाशी परिचित करून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, सामाजिक जाणीव विकसित करणे आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.


इंडक्शन प्रोग्रामच्या निमित्ताने महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धनाला विशेष प्राधान्य देत चक्रेश्वरवाडी परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. विद्यार्थिनींनी उत्साहाने वृक्ष लागवड केली. या उपक्रमातून शिक्षणाबरोबरच निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासाची जाणीव विद्यार्थिनींमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


यानंतर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थिनींना करिअर, व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक आरोग्य, मूल्यशिक्षण, जीवनकौशल्य आणि सामाजिक जाणीव यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले.

निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी महिला आणि शाश्वत विकास या विषयावर महिलांची समाजातील भूमिका, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. अविनाश पालकर यांनी "स्वतःला ओळखा" या विषयावर आत्मविश्वास, स्व-ओळख आणि ध्येय निश्चितीचे महत्त्व स्पष्ट केले. अरुणा मगदूम यांनी आकर्षणाचा सिद्धांत, सकारात्मक दृश्यीकरण तसेच आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले. ए. बी. फराकटे यांनी सार्वत्रिक मानवी मूल्ये या विषयातून नैतिकता, सामाजिक जबाबदारी आणि मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा दिली. एस. बी. पवार यांनी सॉफ्ट स्किल्स आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर प्रभावी संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक व्यक्तिमत्त्व घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.  महेश टकले यांनी तणावमुक्त जीवन आणि प्रभावी अध्ययन या विषयावर विद्यार्थिनींना तणाव व्यवस्थापन, सकारात्मक जीवनशैली, अभ्यासाचे नियोजन आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने "जोडीदारांची विवेकी निवड" या विषयावर संवादात्मक सत्र घेण्यात आले.


कार्यक्रमाअंतर्गत चक्रेश्वरवाडी येथे शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.मेहंदी आणि वक्तृत्व स्पर्धांचे  यांचे आयोजन करण्यात आले.



कार्यक्रमाबाबत विद्यार्थिनींनी समाधान व्यक्त करताना, "महाविद्यालयाने शिक्षणाच्या पहिल्याच आठवड्यात आम्हाला आत्मविश्वास, प्रेरणा आणि आमच्या कलागुणांना व्यासपीठ दिले. हा अनुभव आमच्या भविष्यात निश्चितच मोलाचा ठरेल," अशा भावना व्यक्त केल्या.


कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. अविनाश पालकर यांनी केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील प्रमुख उपस्थित होत्या. जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा इंडक्शन प्रोग्राम यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments