कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी ४ ऑगस्टला कोल्हापूरात राज्यव्यापी परिषद
![]() |
| कृषी उत्पन्न बाजार समिती सेस बाबतच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष संजय शेटे. डावीकडून कुमार अहुजा, बाबासो पाटील, विवेक शेटे, संजीव परीख, प्रदीपभाई कापडिया व अजित कोठारी |
कोल्हापूर दि. ९ सिटी न्यूज नेटवर्क
कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरात ४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी परिषद घेण्याचे ठरविण्यात आले. दि कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशनच्या सभागृहात मार्केट सेस रद्द करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. यावेळी बैठकीमध्ये मार्केट सेसमुळे व्यापारी वर्गावर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार, व्यापारातील वाढत्या अडचणी तसेच व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होणारे प्रतिकूल परिणाम व १९६३ साली लागू झालेला कालबाह्य कायदा, व्यापाऱ्यांची खरेदी मिल कडून होत असताना यामध्ये मार्केट कमिटीचा कोणताही सहभाग नसतो तरी देखील महाराष्ट्र मध्ये दुबार सेस आकारणी होते इ. विषयांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. मार्केट सेस विरोधात मागील वर्षी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे पुणे येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन ५ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले व त्याप्रमाणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची शासनाने दखल घेत मार्केट सेस बाबत निर्णय घेणेसाठी समिती गठीत केली होती. परंतु, त्या समिती तर्फे मार्केट सेस रद्द होणेबाबत आजतागायत कोणताही निर्णय झालेला नाही यावर चर्चा करण्यात आली व उपस्थित सर्व व्यापारी प्रतिनिधींनी मार्केट सेस रद्द करण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख यांनी सुरुवातीस कृषी उत्पन्न बाजार समिती सेस विरोधातील लढा एकसंघपणे लढण्यासाठी कोल्हापूर चेंबरने नेहमीच मदत केली असून आता आरपारची लढाई होणेसाठी राज्यव्यापी परिषद कोल्हापूरात घेणे आवश्यक असून त्यासाठी कोल्हापूर चेंबरने पुढाकार घेत राज्यातील संघटनांना एकत्र आणावे अशी मागणी केली.
कोल्हापूर चेंबर व कॅमिटचे सचिव अजित कोठारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द होणेबाबत कॅमिट या राज्यस्तरीय संघटनेने गेल्या पंधरा दिवसांत ४ ऑनलाईन बैठका घेतल्या होत्या. या बैठकीस कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बारामती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, वाशी, चंद्रपूर, नवी मुंबई, अकोला व राज्यातील अनेक बाजार समिती सेस संबंधित व्यापारी उपस्थित होते. स्थानिक संस्था कर (एलबीटी) हद्दपार होणेसाठी ज्याप्रमाणे कॅमिटने लढा उभारला व एलबीटी रद्द करुन दाखविला त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द होणेसाठी कॅमिट संबंधित व्यापाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. सद्यस्थितीत एलबीटी अस्तित्वात असता तर शासनाने त्यावरही जीएसटी आकारुन व्यापाऱ्यांवर मोठा आर्थिक भार टाकला असता असे सांगत एलबीटी प्रमाणे मार्केट सेस रद्द होणेसाठी कोल्हापूर चेंबर व कॅमिट तर्फे पूर्ण सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया यांनी मार्केट सेसचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून फक्त मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांनी आंदोलनात सहभागी न होता इतर व्यापाऱ्यांनी देखील सहभागी होत शासनाला व्यापाऱ्यांची एकजूट दाखविण्याची गरज असल्याची भूमिका विषद केली.
महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष व कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी अध्यक्षीय भाषणात मार्केट सेस रद्द होणेबाबत कोल्हापूर चेंबर सुरुवातीपासून संबंधित व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून दुबार कर आकारणीला कायमच विरोध राहील असे सांगितले. एक देश, एक मार्केट या संकल्पनेला हरताळ फासणारा हा निर्णय असून जीएसटी असताना मार्केट सेसची वसूली बंद होणेसाठी आवश्यक आहे. तसेच मार्केट परिसरातील नाके हटविणे देखील गरजेचे असल्याचे सांगितले. राज्यव्यापी संघटनेंच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार सर्व शिखर संस्थांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील सर्व व्यापारी संघटनांची राज्यव्यापी परिषद आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेमध्ये राज्यभरातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी सहभागी होऊन मार्केट सेस रद्द होणेबाबत पुढील आंदोलनाची दिशा व भूमिका निश्चित करतील असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुमार अहुजा, दि शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो पाटील, रवा मैदा असोसिएशनचे अमोल नष्टे यांची देखील भाषणे झाली.
व्यापारी हिताशी निगडित हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून राज्यातील सर्व व्यापारी संघटनांनी एकजूट दाखवत या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.
यावेळी वैभव सावर्डेकर, विजय कागले, सुरेश लिंबेकर, विवेक शेटे, श्रीनिवास मिठारी, किरण तपकीरे, अमर क्षीरसागर, संतोष लाड, अभयकुमार अथणे, विवेक नष्टे, अतुल शहा, प्रवीण लिगाडे, शंकर सचदेव, सुंदर पोपटाणी व विविध असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment