पॅरिस फॅशन वीकमध्ये ईशा अंबानींची मोहक छाप; भारतीय कारागिरीला जागतिक व्यासपीठ

 पॅरिस फॅशन वीकमध्ये ईशा अंबानींची मोहक छाप; भारतीय कारागिरीला जागतिक व्यासपीठ



• 700 हून अधिक तासांच्या सूक्ष्म हस्तकलेतून साकारला खास सुवर्णवर्णीय गाऊन

• मनीष मल्होत्रा यांच्या ऐतिहासिक पॅरिस हाउट कुट्यूर पदार्पणाला ईशा अंबानींची उपस्थिती


पॅरिस, 9 सिटी न्यूज नेटवर्क 

 रिलायन्स रिटेलच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनी पॅरिस हाउट कुट्यूर वीकमध्ये भारतीय फॅशनची वैशिष्ट्यपूर्ण ओळख अधोरेखित केली. त्या मनीष मल्होत्रा यांच्या ऑटम/विंटर 2026 हाउट कुट्यूर शोमध्ये सहभागी झाल्या. पॅरिसच्या अधिकृत कुट्यूर कॅलेंडरमध्ये मनीष मल्होत्रा यांच्या पहिल्याच सादरीकरणाला ऐतिहासिक महत्त्व लाभले. या विशेष प्रसंगी ईशा अंबानी यांनी मुंबईत 700 हून अधिक तासांच्या सूक्ष्म हस्तकलेतून साकारलेला आकर्षक सुवर्णवर्णीय गाऊन परिधान केला.


हा गाऊन मनीष मल्होत्रा यांनी स्टायलिस्ट अँड्र्यू मुकामल यांच्या सहकार्याने विशेषतः ईशा अंबानी यांच्यासाठी डिझाइन केला आहे. या गाऊनमध्ये भारतीय जरी-झरदोजी हस्तकला, सली आणि तबान या पारंपरिक भरतकाम शैलींसह हाताने जडवलेले क्रिस्टल्स वापरण्यात आले आहेत. या डिझाइनची प्रेरणा ‘MAA (आई)’ या संकल्पनेतून घेण्यात आली असून, प्रेम, सामर्थ्य आणि सन्मानाच्या बळावर पिढ्या घडविणाऱ्या महिलांना हा गाऊन समर्पित करण्यात आला आहे.


ईशा अंबानी यांनी आपल्या या लूकला लॉरेन श्वार्ट्झ यांचे 50 कॅरेटचे न्यूड डायमंड इअररिंग्स आणि 12 कॅरेटची पिअर-शेप न्यूड डायमंड रिंग यांची जोड दिली. सुवर्णवर्णीय गाऊन आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या या देखण्या संगमातून पॅरिसच्या प्रतिष्ठित फॅशन मंचावर भारतीय कारागिरी आणि आधुनिक डिझाइनचा उत्कृष्ट मिलाफ जगासमोर सादर झाला.


पॅरिसमधील ईशा अंबानी यांच्या उपस्थितीकडे भारतीय डिझायनर्स, लक्झरी ब्रँड्स आणि कारागिरांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग म्हणून पाहिले जात आहे. रिलायन्स रिटेलमधील आपल्या भूमिकेद्वारे त्या भारतीय डिझाइन आणि सर्जनशील प्रतिभेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.


प्रसिद्धीपत्रकानुसार, ईशा अंबानी यांनी पॅरिसमध्ये विशेषतः मनीष मल्होत्रा आणि राहुल मिश्रा यांच्या सादरीकरणांना उपस्थिती लावली. भारतीय डिझायनर्स आणि कारागिरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक संधी उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जात आहे.

Comments