महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बोलीभाषेच्या संशोधनाला नवी दिशा सिनेट सदस्य श्वेता परुळेकर यांना मराठी विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बोलीभाषेच्या संशोधनाला नवी दिशा सिनेट सदस्य श्वेता परुळेकर यांना मराठी विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी


कोल्हापूर ०५ सिटी न्यूज नेटवर्क 

मराठी भाषा, साहित्य आणि संशोधन क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी करत शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव परुळेकर यांच्या कन्या श्वेता शिवाजीराव परुळेकर यांनी मराठी विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली आहे. त्यांना ही पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा विषय "महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बोलीचा वर्णनात्मक अभ्यास (कारवार, बेळगाव, बिदर, भालकी व निपाणी या परिसराच्या अनुषंगाने)" हा असून मराठी भाषेच्या सीमाभागातील समृद्ध भाषिक वारशाचे दस्तावेजीकरण करणारे हे संशोधन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.


मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती, इतिहास आणि सामाजिक अस्मितेची वाहक आहे. सीमाभागातील मराठी बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केलेले हे संशोधन भाषिक वारसा जपण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मराठी भाषेच्या विविध बोलीरूपांचा अभ्यास करून त्यांचे शास्त्रीय दस्तावेजीकरण करण्याचे कार्य त्यांनी या संशोधनाद्वारे केले आहे. सीमाभागातील मराठी भाषेची ओळख, तेथील लोकजीवन, सांस्कृतिक परंपरा, बोलीभाषेतील वैशिष्ट्ये, शब्दसंपदा, उच्चार, वाक्यरचना आणि सामाजिक संदर्भ यांचा सखोल अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनातून मांडला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिक समाजाच्या भाषिक अस्मितेचे जतन करणारे हे संशोधन भविष्यातील अभ्यासकांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे मानले जात आहे.


या यशस्वी शैक्षणिक प्रवासामागे अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रेरणा लाभल्याची भावना श्वेता परुळेकर यांनी व्यक्त केली आहे. महावीर महाविद्यालयाच्या संस्थेचे चेअरमन अॅड. के. ए. कापसे साहेब व संस्थेच्या सर्व सन्मानीय संचालकांनी उच्च शिक्षणासाठी दिलेले प्रोत्साहन आणि सातत्याने दाखविलेला विश्वास हा या यशाचा महत्त्वाचा आधार ठरल्याचे त्यांनी नमूद केले.


शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के, प्र-कुलगुरू पी.एस. पाटील आणि कुलसचिव व्ही.एन. शिंदे यांचे मोलाचे सहकार्य संशोधनाच्या प्रवासात लाभले तर या संशोधन कार्याला दिशा देणारे ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस सर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, मराठी विभागप्रमुख डॉ. नंद‌कुमार मोरे, डॉ. गोमटेश्वर पाटील, तसेच प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे यांचे वेळोवेळी मिळालेले शैक्षणिक मार्गदर्शन हे या संशोधनाच्या यशामागील महत्त्वाचे बळ ठरले.


मात्र या सर्व प्रवासात सर्वात मोठा आधार ठरले ते त्यांचे आई-वडील. वडील शिवाजीराव परुळेकर आणि आई शीला परुळेकर यांनी प्रत्येक टप्प्यावर दिलेला मानसिक, नैतिक आणि भावनिक पाठिबा यामुळेच हे यश प्राप्त करता आले, अशी कृतज्ञ भावना देता परुळेकर यांनी व्यक्त केली. संशोधनाचा प्रदीर्घ आणि आव्हानात्मक प्रवास अनेकदा संयम, जिद्द आणि चिकाटीची परीक्षा पाहणारा असतो. अशा वेळी सासर व माहेरच्या दोन्हीच्या कुटुंबाने दिलेले बळ हेच यशाचे खरे प्रेरणास्थान ठरते सांगितले.


शैक्षणि सातत्यपूर्ण अभ्यास, संशोधनाची आवड, सामाजिक बांधिलकी आणि मराठी भाषेविषयीची निष्ठा यामुळे श्वेता परुळेकर यांनी हे मानाचे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील संशोधनात्मक आणि शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Comments