महाराष्ट्र चेंबरच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
मुंबई ०७ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई च्या २०२६–२०२८ या कार्यकाळातील अध्यक्ष व कार्यकारिणी मंडळाचा पदग्रहण सोहळा शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, गृहराज्य मंत्री पंकज भोईर, उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र चेंबरचे जीसी सदस्य तथा आमदार राहुल आवाडे, माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार प्रवीण दरेकर, बाबूराव कदम-कोहळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात महाराष्ट्र चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्षा डॉ. धनश्री हरदास, उपाध्यक्ष किरण भोसले, उपाध्यक्ष संतोष राणे, उपाध्यक्षा सौ. सुनीता फाल्गुने, उपाध्यक्ष महेंद्र अग्रवाल, उपाध्यक्ष सर्जेराव नलावडे, उपाध्यक्ष सुनील किर्दक, उपाध्यक्ष सिद्धार्थ रूहाटिया, विशेष निमंत्रित वेदांशू पाटील आणि सर्व गव्हर्निंग कौन्सील सदस्य यांनी पदग्रहण केले. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे सर कार्यवाह सुरेश घोरपडे उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) च्या नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी अध्यक्षीय चषक स्वीकारून अध्यक्षपदाचा पदभार ग्रहण केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र चेंबरच्या ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे विशेष कौतुक करत, प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करण्याची ही संकल्पना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात उद्योजकता वाढवून रोजगारनिर्मितीला चालना देण्याबरोबरच महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा उपक्रम मोलाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग क्षेत्रात वेगाने विकसित होत असलेल्या Artificial Intelligence (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विशेषतः MSME क्षेत्राने AI तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच सौरऊर्जा मॉड्यूलचा उल्लेख करत, हे मॉड्यूल उद्योग, शेती आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. हे मॉड्यूल लवकरात लवकर महाराष्ट्र चेंबरसमोर सादर करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र चेंबरच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. उद्योग, व्यापार, कृषी, नवउद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्र चेंबर अधिक प्रभावी योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती; चेंबरसोबत करणार सामंजस्य करार
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र चेंबरच्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. विशेषतः ‘गाव तेथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे त्यांनी अभिनंदन करत, हा उपक्रम ग्रामीण भागात उद्योजकता विकासासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमाबद्दल त्यांनी अध्यक्ष रविंद्र माणगावे यांचे विशेष अभिनंदन केले.
उद्योजकांना अधिक प्रभावी सेवा, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरसोबत सामंजस्य करार (MOU) करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत, लवकरच त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र चेंबरने सातत्याने पाठपुरावा केलेल्या एमएसएमईसाठी स्वतंत्र आयुक्तालयाच्या मागणीचाही त्यांनी उल्लेख केला. शासनाने ही मागणी मान्य करून स्वतंत्र एमएसएमई(MSME) आयुक्तालयाची स्थापना केल्याचे सांगत, या विषयावर महाराष्ट्र चेंबरने केलेल्या विधायक पाठपुराव्याचे त्यांनी कौतुक केले.
तसेच, राज्यातील उद्योजकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आयोजित ‘जनता दरबार’ उपक्रमामध्ये महाराष्ट्र चेंबरने सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र चेंबरच्या आगामी शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही देत, “उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि महाराष्ट्र चेंबर यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे,” असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
दरम्यान, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील हे प्रमुख उपस्थित म्हणून येणार होते. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहता आले नाही. तथापि, महाराष्ट्र चेंबरच्या वतीने मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर आणि पदाधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Comments
Post a Comment