'गोकुळची बदनामी थांबवा; लाखो दूध उत्पादकांच्या अस्मितेशी खेळ खपवून घेणार नाही!' – डॉ. युवराज येडूरे यांचा इशारा

 'गोकुळची बदनामी थांबवा; लाखो दूध उत्पादकांच्या अस्मितेशी खेळ खपवून घेणार नाही!' – डॉ. युवराज येडूरे यांचा इशारा



८ जुलै रोजी गोकुळ चौकात एकदिवसीय आत्मक्लेश आंदोलन; दूध उत्पादक, संस्था प्रतिनिधी, कर्मचारी, वितरक व ग्राहकांना सहभागाचे आवाहन


कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क 

"गोकुळ दूध संघ हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा राजकीय गटाचा नाही. तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टांचा, विश्वासाचा आणि अस्मितेचा वारसा आहे. गोकुळची बदनामी करून शेतकऱ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही," असा घणाघाती इशारा डॉ. युवराज येडूरे यांनी दिला आहे.


गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष आणि बदनामीच्या वातावरणाविरोधात डॉ. येडूरे यांनी ८ जुलै रोजी गोकुळ चौक, गोकुळ शिरगाव येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत एकदिवसीय प्रतीकात्मक आत्मक्लेश आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.


डॉ. येडूरे यांनी स्पष्ट केले की, त्यांची कोणतीही दूध संस्था नसून गोकुळ दूध संघात कोणतेही अधिकृत पदही नाही. "मी एका सामान्य दूध उत्पादक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आमच्या घरचा संसार जनावरांच्या दुधावर चालला. माझे शिक्षणही दुधाच्या पैशातून झाले. त्यामुळे गोकुळ हा माझ्यासाठी केवळ ब्रँड नसून भावना, विश्वास आणि आयुष्याशी जोडलेली अस्मिता आहे," असे त्यांनी सांगितले.


त्यांनी म्हटले की, गोकुळमुळे लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. दुधाच्या नियमित बिलावर मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला आहे. आज गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनली आहे.


"गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, आनंदराव पाटील चुयेकर तसेच आजपर्यंत योगदान देणारे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्यामुळे ही संस्था उभी राहिली आहे. त्यामुळे तिची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही," असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.


गोकुळची उत्पादने देशभर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत, हा प्रत्येक दूध उत्पादकाचा ध्यास असल्याचे सांगत त्यांनी सध्याचे राजकारण आणि वाद संस्थेच्या प्रतिमेला तडा देत असल्याची खंत व्यक्त केली.


"हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन गोकुळच्या प्रतिष्ठेसाठी, दूध उत्पादकांच्या हितासाठी आणि सहकाराच्या मूल्यांच्या संरक्षणासाठी आहे," असे स्पष्ट करत त्यांनी सर्व दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक, कर्मचारी तसेच विविध संस्था व संघटनांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.


प्रतीकात्मक आत्मक्लेश आंदोलन


- स्थळ : गोकुळ चौक, गोकुळ शिरगाव

- दिनांक : ८ जुलै २०२६

- वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.००

Comments