डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स ग्रुप रंकाळा चौपाटीतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान
कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त जायंट्स ग्रुप रंकाळा चौपाटी, कोल्हापूर यांच्या वतीने मुक्या प्राण्यांच्या आरोग्यसेवेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सॅम लुड्रिक, डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, डॉ. सोनाली कुलकर्णी, डॉ. अमोल आणि डॉ. मंगेश यांचा गौरव करण्यात आला. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी असून त्यांनी समाजातील सर्व घटकांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. आजचे पशुवैद्यकीय रुग्णालय हे पूर्वी शाहू महाराजांच्या अश्वशाळेसाठी प्रसिद्ध होते. पशुवैद्यकीय अधिकारी केवळ पशूंवर उपचारच करत नाहीत, तर त्यांच्या प्रजनन क्षमतेच्या वाढीसाठीही कार्यरत असतात. या रुग्णालयात पशूंची सोनोग्राफी तसेच शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी जायंट्स ग्रुपचे आभार मानले. तसेच त्यांनी उपस्थितांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्रा. तानाजी पाटील यांनी डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत त्यांच्या समाजोपयोगी योगदानाची माहिती दिली. संस्थापक समन्वयक बबिता जाधव यांनी प्रास्ताविकात जायंट्स ग्रुपच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी कार्याध्यक्ष कमल पाटील, उपाध्यक्ष अनिता काळे, सुनंदा मोरे, युनिट अधिकारी वैशाली कांबळे, विजय जाधव, शिवाजीराव डावरे यांच्यासह जायंट्स ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments
Post a Comment