सिटी न्यूज़
महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा युवा शक्ती दहीहंडी रद्द,
दहीहंडीची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरणार
कोल्हापूर १८ :कोल्हापूरवर ओढवलेली अभूतपूर्व पुराची आपत्ती पाहता धनंजय महाडिक युवा शक्तीच्यावतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा दहीहंडी सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे. यावर्षी महापुराने प्रचंड हाहाकार केला. हजारो घरे पाण्याखाली गेली आणि लाखो नागरिक विस्थापित झाले. कित्येक संसार महापुरामुळे उद्ध्वस्त झाले. अशा वेळी धनंजय महाडिक युवा शक्तीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भरीव कार्य केले. हजारो कुटुंबांना सकस भोजन तर पुरवलेच. पण पूर ओसरल्यानंतर अनेक कुटुंबांना आवश्यक शिधा, जीवनावश्यक वस्तू आणि भांडी दिली. तरीही सामाजिक जाणिवेचे भान ठेवून, युवा शक्तीच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सव यंदा आम्ही रद्द करत आहोत. दहीहंडीसाठी बक्षिसे आणि खर्च होणारी अन्य रक्कम, आम्ही पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि मदतीसाठी वापरणार आहोत. कारण यावर्षीचा महापूर अभूतपूर्व असे संकट होते. त्यातून कित्येक कुटुंबे खचली आहेत. अशा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी युवा शक्ती सदैव अग्रेसर आहे. दरवर्षी युवा शक्तीच्या दहीहंडीमध्ये शिरोळ तालुक्यातील अनेक गोविंद पथके सहभागी होतात. मात्र, यावर्षी महापुरामुळे शिरोळ तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळेसुद्धा या गोविंदा पथकांच्या परिस्थितीचा विचार करून, आम्ही युवा शक्ती दहीहंडी रद्द केली आहे. या पूरपरिस्थितीतून सावरण्यासाठी शासनाच्या बरोबरीने, युवा शक्तीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील आणि कोल्हापूरकरांचे जनजीवन सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करतील, याची खात्री वाटते.
Comments
Post a Comment