किरणोत्सवासाठी अतिक्रमण खुले करणे, देवस्थान सुशोभिकरण निधी व्यय करण्यातही महापालिकेची अनास्था

 सिटी न्यूज़ 
किरणोत्सवासाठी अतिक्रमण खुले करणे, देवस्थान सुशोभिकरण निधी व्यय करण्यातही महापालिकेची अनास्था 
मनकर्णिका कुंड खुले करण्यास देवस्थान समिती सिद्ध; मात्र महापालिकेचे सहकार्य नाही ! - महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती 

मनकर्णिका कुंड खुले करण्यास देवस्थान समिती सिद्ध; मात्र महापालिकेचे सहकार्य नाही ! - महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती 
कोल्हापूर, १६ सप्टेंबर (.) - मनकर्णिका कुंडाची भूमी ही पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मालकीची आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका ठरावानुसार ही भूमी काही अटींवर महापालिकेला देण्यात आली. हे कुंड आणि त्याची भूमी महापालिकेच्या कह्यात गेल्यावर त्यांनी वर्ष १९५८ मध्ये हे कुंड बुजवले. आता हे कुंड परत खुले करण्याच्या संदर्भात आम्हाला पुरातत्त्व खात्याचे लेखी पत्र प्राप्त झाले आहे. ही भूमी हस्तांतरित करण्यासाठी आम्ही गेले सहा मास महापालिकेशी पत्रव्यवहार करत आहोत; मात्र त्यासाठी महापालिकेचे सहकार्य लाभत नाही. येणार्‍या महासभेत महापालिकेने या संदर्भात ठराव न केल्यास आम्ही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून या कुंडाची भूमी आमच्या कह्यात घेऊन ते भक्तांसाठी खुले करू, अशी माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी १६ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कोषाध्यक्ष सौ. वैशाली क्षीरसागर, तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. 
* या वेळी महेश जाधव म्हणाले 
१. कुंडाची भूमी आमच्या कह्यात मिळण्यासाठी महापालिकेचे शहर अभियंता, तसेच अन्य अधिकार्‍यांशी मी सातत्याने बोलत आहे. सध्या कागदोपत्री ही भूमी महापालिकेच्या कह्यात असल्याने महापालिकेकडून आम्हाला तसा ठराव करून मिळणे आवश्यक आहे. हा ठराव महापालिकेच्या सभेत होण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत; मात्र त्याला महापालिकेकडून दुर्लक्षित करण्यात येत आहे. 
२. श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेला दर्शन मंडप, रस्ता, वाहनतळ यांसाठीचा कोट्यवधी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून थेट महापालिकेला वर्ग झाला आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका त्या संदर्भात काहीच हालचाल करण्यास सिद्ध नाही. पालकमंत्र्यांनीही सांगूनही महापालिका ऐकत नसेल, तर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराविषयी महापालिका गंभीर नाही, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. 
३. श्री महालक्ष्मी देवीच्या किरणोत्सवाच्या वेळी मार्गात येणारे अतिक्रमण काढण्यासाठीही महापालिका विलंब करत आहे. शेवटी मी अतिक्रमण काढण्यासाठी रस्त्यावर उतरल्यावर काही प्रमाणात कृती झाली. 
४. नवरात्र उत्सवाच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक होती. याला शहरातील सर्व विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अशा महत्त्वाच्या बैठकीस महापालिकेचे प्रतिनिधी उशिरा उपस्थित झाले. यावरून प्रत्येक विषयाच्या संदार्भात महापालिकेला गांभीर्य किती आहे, हेच लक्षात येते. 
५. दर्शन मंडपासह अन्य काम करणे महापालिकेला शक्य होत नसेल, तर महापालिकेने आम्हाला तसे सांगावे ही कामे भक्तांच्या सोयीसाठी आम्ही करतो.

Comments