गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याना दिलेल्या तडीपार च्या नोटीसा तातडीने मागे घ्या:आमदार राजेश क्षीरसागर

सिटी न्यूज़ 

गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याना दिलेल्या तडीपार च्या नोटीसा तातडीने मागे घ्या, मंडळांवरील दडपशाही खपवून घेतली जाणार नाही : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा इशारा


कोल्हापूरचा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे मंडळांनाही आवाहन 

कोल्हापूर दि. १० : कोल्हापूर शहराला सुमारे सव्वाशे वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा लाभली आहे. कोल्हापूरात गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यावर आलेल्या पूरपरिस्थिती मध्ये पूरग्रस्त नागरिकांचे कुटुंब पुन्हा उभे करण्यासाठी शहरातील सर्वच तालीम संस्था आणि गणेश मंडळांनी अहोरात्र काम आणि मदत केली. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून बचावकार्यात मंडळांचे कार्यकर्ते प्रशासनाच्याही  पुढे होते. त्याचबरोबर सामाजिक भावना जपत अनेक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले, असे असतानाही गतवर्षी मे.सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाअधीन राहून साऊंड सिस्टमचा वापर करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना चक्क तडीपारच्या नोटीस देण्याचा प्रताप पोलीस प्रशासनाने केला आहे. ही हिटलरशाही कोल्हापुरात खपवून घेतली जाणार नाही. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या तडीपार च्या नोटीसा तातडीने मागे घ्या, अन्यथा शिवसेना शांत बसणार नाही, असा इशारा आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रशासनास दिला आहे. यासह दरवर्षीप्रमाणे यंदाची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी, असे आवाहन गणेशोत्सव मंडळांना केले. याबाबत त्यांनी आज प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
            यात पुढे म्हंटले आहे कि, गणेशोत्सव आला कि प्रशासन फक्त कोल्हापुरातीलच साऊंड सिस्टमवर का कारवाई करते याचे गौडबंगाल कळालेले नाही. गणेशोत्सव सनात सर्वच धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने सहभागी होतात. गणेशोत्सवाचा आधी सुमारे महिनाभर मंडळाचे कार्यकर्ते राबत असतात. आपल्या बाप्पाला आगमन व निरोप जल्लोषात द्यावा, सहाजिकच अशी अपेक्षा प्रतेक मंडळास आणि कार्यकर्त्यास असते. परंतु, कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, पुणे, मुंबई येथे मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टमला परवानगी दिली जाते तर कोल्हापुरात दडपशाहिने निर्बंध लादले जातात.
             यापूर्वीच्या गणेश आगमन मिरवणूकीमध्ये राजारामपुरीतील मंडळांवर अन्याय केला जातो.  आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मंडळांनी मे.सर्वोच्च न्यायालयाच्या नियमा अधीन राहून साऊंड सिस्टम, लाईट इफ्फेक्ट लावले होते. परंतु, पोलीस प्रशासनाने दंडुकशाहीचा वापर करून सदर साऊंड सिस्टम बंद केले. मशिनरी जप्त केली, स्क्रीन लाईट इफेक्टवर काठ्या मारून त्याचे नुकसान केल्याच्या हिटलरीवृत्तीच्या घटना घडल्या आहेत. एवढ्यावर न थांबता मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आलेच पण आता साऊंड सिस्टम लावली म्हणून मंडळाच्या ८२ कार्यकर्त्यांवर चक्क हद्दपारीच्या नोटीस काढण्यात आल्या आहेत. सदर कार्यकर्त्यांनी असा कोणता गुन्हा केला कि त्यांना गुंडाची वागणूक देवून तडीपार च्या नोटीस देण्यात आल्या? याचा पोलीस प्रशासनाने खुलासा करणे गरजेचे आहे. शहरातील मंडळे आणि कार्यकर्ते फक्त गणेशोत्सवापुरती मर्यादित काम करत नसून वर्षभर सामाजिक उपक्रमात सक्रीय असतात याची जाण प्रशासनाने राखणे गरजेचे आहे. कोल्हापूर कोल्हापूर ओढावलेल्या पूरपरिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणा सक्रीय होण्या पूर्वीच शहरातील या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचे काम सुरु केले होते. याची थोडीशी दखल प्रशासनाने घेतली असती तर त्यांना हद्दपारीच्या नोटीस काढण्याची दुर्बुद्धी सुचली नसती. यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव सुरु असताना कार्यकर्त्यांना अशा हद्दपारीच्या नोटीस देवून शहरात अशांतता पसरविण्याचे काम प्रशासन करीत आहे. कोल्हापुरात अशी दादागिरी खपवून घेतली जात नाही. गणेशोत्सव मंडळाच्या संयमाची परीक्षा घेवू नये, त्याच मुळे पोलीस प्रशासनाने तातडीने या नोटीस मागे घ्याव्यात आणि गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा शिवसेना शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.
            त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीतून पूरग्रस्तांना उभारण्यासाठी शहरातील तमाम तालीम संस्था आणि मंडळांनी केलेल्या मदत कार्याचे अभिनंदन करीत कोल्हापूरचा गणेशोत्सव दरवर्षी प्रमाणे शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्याची भूमिका ठेवावी, असेही आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. 

Comments