आमदार चंद्रकांत जाधव यांनी साधला नगरसेवकांबरोबर संवाद

बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची माहिती नगरसेवकांनी घ्यावी
आमदार चंद्रकांत जाधव यांनी साधला संवाद


कोल्हापूर, ता.10  – कोल्हापूर शहरात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची माहिती घेण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे, असे मत आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या चौथ्या टप्प्यात तो अधिक प्रमाणात फैलावण्याची शक्यता आहे, त्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि याच कालावधीत बाहेरगावाहून आपापल्या गावाकडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याप्रमाणे शहरातही मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. बहुतांश नागरिकांनी शहरात येताना योग्य ती खबरदारी घेऊनही रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर श्री. जाधव यांनी नगरसेवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्ससिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भाग घेतला.
आमदार जाधव म्हणाले, आज प्रत्येकजण आपापल्या गावाकडे जात आहे. अशावेळी कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. अशावेळी त्यांचे क्वारंटाईन करणे जरुरी आहे. शहराची रचना पाहता काहीना होम, तर काहीना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करावे लागणार आहे. याचे नियोजन नगरसेवकांनी करावे. यासाठी सर्व नगरसेवकांचा व्हॉटस अप ग्रुपही तयार करावा. ज्यायोगे प्रत्येकाला माहिती मिळेल.
दरम्यान, नगरसेवकांनी प्रत्येकाच्या प्रभागात चाललेले कार्य आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी घेतलेली दक्षता यासंबंधी विवेचन करून आणखी काय खबरदारी घेता येईल, यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.
आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले की, प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याची तपासणी वेळोवेळी करीत आहोत. त्यांना आयुषचा काढाही दिला आहे. याचबरोबर शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुषचा काढा देण्याचे नियोजन आहे, त्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा.
भाजी मंडई व दवाखाना यासारख्या ठिकाणी सुरक्षित अंतरासाठी पाच जणांच्या पथकांची नियुक्ती केली आहे. प्रभागनिहाय कामाचे वाटप केले असून जनजागृतीबरोबरच मास्कचे वाटप, सॅनिटायझरचे वाटप या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देत आहोत. अगदी भाजी विक्रेत्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबर थर्मल स्कॅनर करून प्रसंगी भाजी जप्त करण्याच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, असेही म्हणाले.
आयुषचा फार्म्युला
आमदार जाधव यांनी सूचना केली की, आयुषचा काढा कसा तयार केला जातो, याचा फार्म्युला या क्षेत्रातील जाणकारांनी सांगावा. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक असा काढा घरीच तयार करून घेतील अथवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तो सर्वांना देता येईल.  

Comments