प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचे निधन

           प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचे निधन 




रत्नाकर मतकरी (१९३८-२०२०)



ज्येष्ठ साहित्यिक, संवेदनशील रंगकर्मी, वंचितांच्या रंगमंचा चे प्रणेते, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट चे माजी विश्वस्त रत्नाकर मतकरी यांचं वयाच्या 81 व्या वर्षी दुःखद निधन! एक महान माणूस काळाच्या पडद्याआड!!समाजाची खूप मोठी हानी!!!

काल दिनांक १७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे देहावसान झाले. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेक अप साठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे देहावसान झाले. मृत्यूसमयी ते एक्याऐशी वर्षांचे होते. 

१९५५ मधे, वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते.
मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोचवला.

मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’  अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.

रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून  पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो. रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी,  कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे. मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे

Comments