थेट पाईपलाईनच्या कामाला गती येणार
आमदार चंद्रकांत जाधव यांनी घेतला आढावा
कोल्हापूर, ता. १८ – थेट पाईपलाईनच्या कामाला पुन्हा गती येणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज या योजनेचा आढावा घेऊन त्वरित काम सुरू करण्याची सूचना केली.
कोल्हापूर शहरासाठी सव्वाचारशे कोटींची थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. परंतु, शासनाच्या विविध विभागांच्या परवानग्या न घेतल्याने पहिल्या महिन्यापासूनच योजना रखडली. 2016 ला योजना पूर्ण होऊन शहरवासीयांना पाणी मिळायला पाहिजे होते. मात्र, अद्यापही काही परवानगी मिळालेल्या नाहीत. काही ठिकाणी जलवाहिनी टाकण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. योजनेच्या कामाची मुदत संपून तीन वर्षे उलटली. त्यामुळे थेट पाईपलाईनचे पाणी मिळणार कधी, अशी विचारणा नागरिकातून होत आहे. तीस किलोमीटर लांबीच्या विद्युत वाहिनीसह काळम्मवाडी धरण क्षेत्रातील योजनेची अत्यंत महत्त्वाची कामे अपूर्ण आहेत. पुढील महिन्यापासून पावसाला सुरवात झाल्यास धरण क्षेत्रात काम करणे अशक्य होईल. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज आढावा बैठक घेतली. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सद्यःस्थितीतील कामाची माहिती देऊन पुढील नियोजनाची माहिती दिली. लॉकडाउनमुळे कामगारांची समस्या आणि दिल्लीहून येणाऱ्या क्रेनमुळे जॅकवेलचे काम थांबले होते. मात्र आता आहे त्या कामगारांना घेऊन काम सुरू करण्याची ग्वाही यावेळी ठेकेदाराने दिली.
यावेळी श्री. जाधव यांनी पाईपलाईनचे काम गतीने पूर्णत्वाकडे कसे जाईल, याकडे लक्ष द्या, अशा सूचना महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, कपिलेश्वर, देवाळे, काळम्मावाडी गाव येथील नागरिकांचा पाईपलाईनला असणारा विरोध मावळला असून तेथीलही काम पूर्ण होत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली, तर सोळांकूर येथे होणारा विरोध तेथील लोकांशी चर्चा करून सोडवू. प्रत्यक्ष काम कोणत्या टप्प्यावर आले आहे, याची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमवेत येत्या रविवारी (ता. २४) प्रत्यक्ष साईट व्हिजिट करणार असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली.
यावेळी प्रोजेक्ट इंजिनियर राजेंद्र माळी, योजनेचे सल्लागार श्री. मोहिते, जल अभियंता बी. एम. कुंभार, तांत्रिक अभियंता आर. बी. गायकवाड आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment