कोटीतीर्थ तलावातील जलपर्णी काढण्याचे काम 24 तासात सुरू करा; अन्यथा जल आंदोलन
'
कोल्हापूर 23 सिटी न्यूज नेटवर्क
कोटीतीर्थ तलावातील प्रदूषणात वाढ झाल्याने तलाव जलपर्णीने व्यापला आहे. तलावातील बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड वाढल्याने तलावातील मासे व इतर जलचर मृत्युमुखी पडल्याचे समोर आले होते. त्यानंतर यावर उपाययोजना होणे गरजेचे होते, परंतु जलपर्णी काढण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. महापालिकेकडून केंदाळ काढण्याचे काम सुरू केले गेले, परंतु एकाच दिवसात ते काम बंद पडले.
येत्या 24 तासात तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू झाले नाही तर जल आंदोलन करण्यात येईल असा इशारा 'आप'चे युवक जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांना दिला.
जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेने थांबवले आहे. महापालिकेचे अधिकारी आपले ऐकत नाहीत का, आपल्या विभागाचा वचक संपला आहे का असा सवाल पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना केला.
कोटीतीर्थ तलावामध्ये यादवनगर परिसरातून येणाऱ्या सांडपाण्याचे सॅम्पल घेऊन ते पाणी तलावामध्ये मिसळण्यापासून थांबावे. परिसरातील महिलांना कपडे धुण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बऱ्याचदा ते तलावामध्ये कपडे धुण्यास येतात. कपडे धुण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणास रोखण्यासाठी धुण्याची चावी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेला निर्देश व्हावेत. तलावाचा वापर जनावरे धुण्यासाठी केला जातो. तो थांबवून जनावरे धुण्यासाठी स्वतंत्र कुंड तयार करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
निर्माल्य तलावात टाकण्यापासून थांबवण्यासाठी निर्माल्य कुंड बसवण्याचे निर्देश महापालिकेला द्यावेत. तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी काही व्यक्तींकडून केमिकल टाकण्यात येते का याची तपासणी करण्यात यावी. अशा व्यक्तींवर कारवाई करून केमिकल टाकणे त्वरित बंद करावे. तलावातील पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर पाणी निर्गत होण्यासाठी ओव्हरफ्लो ड्रेनपाईपची व्यवस्था करण्यात यावेत. तलावामध्ये ड्रेन अस्तित्वात असल्यास त्याची स्वच्छता करून चोकअप काढण्यात यावेत अशा सूचना 'आप' शिष्टमंडळाकडून करण्यात आल्या.
यावेळी युवक शहराध्यक्ष मोईन मोकाशी, विशाल वठारे, डॉ. कुमाजी पाटील, मयूर भोसले, राज कोरगावकर, अभिजित भोसले, दत्तात्रय बोन्गाळे, राजेश खांडके आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment