कितीही आक्रमणे झाली तरी शिवसेना नमणार नाही,
भाजपचा "हम करे सो कायदा"चा जनताच बिमोड करेल : श्री.राजेश क्षीरसागर
परिवहन मंत्री नाम.अनिल परब यांच्यावरील सुडबुद्धीच्या कारवाईचा शिवसेनेकडून जाहीर निषेध
कोल्हापूर दि.२६ : सिटी न्यूज नेटवर्क
केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून रडीचे राजकारण करत भाजप महाविकास आघाडीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीसह खासकरून शिवसेनेच्या नेत्यांना भाजपच्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून टार्गेट केले जात आहे. परंतु, अंगावर आले की शिंगावर घेण्याची शिकवण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली असून, कितीही आक्रमणे झाली तरी शिवसेना नमणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिला.
शिवसेनेचे परिवहन मंत्री नाम.अनिल परब यांच्यावर सूडबुद्धीतून करण्यात येत असलेल्या कारवाई विरोधात कोल्हापुरातील शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती ताराराणी चौक येथे आंदोलन करत ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यात आला.
यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "ईडी कि घरगडी", "सूडबुद्धीने होणाऱ्या कारवाईचा जाहीर निषेध" अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्याची स्वप्ने उधळल्याचे दिसत असल्याने भाजप नेते सैरभैर झाले आहेत. शिवसेना कुणासमोर झुकत नाही, हे माहित असल्याने केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून सूडबुद्धीने शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या मंत्री, नेते मंडळींवर कारवाई करण्याची सुपारी ईडी विभागाला देण्यात आली आहे. परंतु, शिवसैनिकाच्या रक्तात शिवसेनाप्रमुखांचे विचार भिनले असून, शिवसैनिक असल्या कारवायांना भिक घालत नाही. भाजपने अशा कितीही कारवाया करून नमविण्याची रणनीती आखली तरी शिवसैनिक सक्षम आहे. सूडबुद्धीने होणारी कारवाई जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. महागाई, दरवाढ, रोजगार यावर कोणताही भाजप नेता बोलताना दिसत नाही. जनता दुधखुळी नसून भाजपचा हम करे सो कायदा आता जनताच मोडून काढेल. त्यामुळे भाजप पुरस्कृत कारवाया तातडीने थांबवाव्यात अन्यथा येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत भाजप केंद्र व राज्यातून पायउतार झालेली दिसेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, शिवाजी जाधव, नंदकुमार मोरे, रवीभाऊ चौगुले, सुजित चव्हाण, दीपक गौड, किशोर घाटगे, रघुनाथ टिपुगडे, हर्षल सुर्वे, रियाज बागवान, मंजीत माने, राजू यादव, महिला आघाडीच्या स्मिता सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment