अग्निपथ योजना मागे घ्या, युवकांनी मोदींना लिहले रक्ताचे पत्र

 अग्निपथ योजना मागे घ्या, युवकांनी मोदींना लिहले रक्ताचे पत्र 



'शाश्वत रोजगार द्या, अग्निपथ मागे घ्या' च्या लगावल्या घोषणा


'आप' युवा आघाडीचे बिंदू चौकात आंदोलन

कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी इच्छुक युवकांसाठी अग्निपथ योजना जाहीर केली. भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी या योजनेला जोरदार विरोध केला आहे. या योजनेचा 17.5 ते 23 वयोगटातील युवकांना सैन्यामध्ये भरतीची  करून त्यानंतरच्या सेवेची कोणतीही हमी न देता कार्यमुक्त केले जाणार आहे. भारतीय सैन्याच्या एकूण शिस्तीलाच आवाहन देणारी ही योजना आहे. भरती झालेल्या युवकांना 'अल्प कालावधीसाठी' सेवेत घेऊन त्यांच्या भविष्यावर टांगती तलवार ठेवली जात आहे. या योजनेचा पुनर्विचार करून ही योजना मागे घ्यावी यासाठी आम आदमी पार्टी युवा आघाडीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्ताचे पत्र लिहून विनंती केली आहे. 'शाश्वत रोजगार द्या, 'अग्निपथ' मागे घ्या' या आशयाचे पत्र 'आप' युवा आघाडीने मोदींना लिहले आहे. 


रक्ताच्या पत्राद्वारे पंतप्रधानांना या योजनेच्या विरोधाचे गांभीर्य समजावे यासाठी लिहले असल्याचे 'आप' युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितले. 


पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात अग्निपथ योजनेचा पुनर्विचार होऊन भरती प्रक्रियेसाठी उत्सुक असलेल्या युवकांशी, संसदेतल्या संरक्षण समितीवर असलेल्या सदस्यांशी तसेच भारतीय सैन्यातील आजी-माजी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करूनच यावर निर्णय घेण्यात यावा, तोपर्यंत ही योजना मागे घेण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी सांगितले.


गेली दोन वर्षांपासून रखडलेली सैन्य भरती त्वरित सुरू करावी. रखडलेल्या सैनिक भरतीमुळे वयोमर्यादा उलटलेल्या युवकांना संधी वाढवून मिळावी या मागण्या देखील पत्रात नमूद केल्या आहेत.


भारतीय सैन्याची शिस्तबद्धता अबाधित राखून, योग्य मानसन्मान व सेवेची शाश्वती असलेली योजना तयार करून सैन्य भरती करण्यात यावी.


भरतीसाठी इच्छुक युवकांवर, तसेच सैन्याच्या मनोबलावर या योजनेचा होणारा परिणाम लक्षात घेत, मोदींनी  राष्ट्रहिताचा विचार करून ही योजना मागे घ्यावी अशी विनंती या पत्राद्वारे 'आप' युवा आघाडीने केली.


यावेळी उत्तम पाटील, मोईन मोकाशी, सूरज सुर्वे, आदम शेख, राज कोरगावकर, प्रथमेश सूर्यवंशी, मयूर भोसले, अभिजित कांबळे, विजय हेगडे, डॉ. कुमाजी पाटील, बसवराज हदीमनी, भाग्यवंत डाफळे, शकील मोमीन आदी उपस्थित होते.

Comments