कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यासाठी भाजपाची महानगर पालिकेवर धडक कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट

 कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यासाठी भाजपाची महानगर पालिकेवर धडक कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट



कोल्हापूर दि.२२ सिटी न्यूज नेटवर्क

सहा महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीने उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्यात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने आज महानगरपालिकेवर जोरदार निदर्शने केली. राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अधिकारी लवकर भेटावयास न आल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांशी झटापट झाली.



जानेवारी महिन्यात भारतीय जनता पार्टीने कचरा घोटाळा उघडकीस आणला होता. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचरा विनाप्रक्रिया बावड्यातील अनेक शेतांमध्ये टाकल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावर महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पंचनामा करून त्यात ही बाब स्पष्ट केली होती. तसेच महानगरपालिकेच्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीतही हा गैरप्रकार सिद्ध झाला होता. परंतु सहा महिने उलटून गेल्यानंतरही या घोटाळ्यातील दोषी असलेला कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर अत्यंत जुजबी कारवाई करून प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत भाजपने आज निदर्शने केली.



'कचरा खाणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो', 'दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धिक्कार असो', 'कचरा शेठ च करायचं काय खाली डोकं वर पाय', 'महापालिका प्रशासन हाय हाय'  अशा घोषणांनी महापालिका परिसर दुमदुमून गेला. चंद्रकांत घाडगे, विजय खाडे पाटील, अजित ठाणेकर, राहुल चिकोडे आणि महेश जाधव यांनी कचरा घोटाळ्याची व्याप्ती, त्याचा परिणाम, महानगरपालिकेतील प्रशासनाचा धोरण लकवा अशा विषयावर सडकून टीका केली. सुमारे तासभर निदर्शने केल्यानंतर महानगरपालिकेचे कोणी अधिकारी चर्चा करण्यास न आल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि महानगरपालिकेच्या दरवाजाकडे धावले. त्यावेळी पोलिसांनी बळजबरीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला आत जायचे नाही अधिकाऱ्यांना बाहेर बोलवा अशी मागणी कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतरही पुन्हा काही वेळ गेल्याने कार्यकर्ते आणखीन संतप्त झाले आणि दरवाजा ढकलून घुसण्याचा प्रयत्न करू लागले.  त्यातच काही महिलांनी हातातील बांगड्या गेटवरून फेकून प्रशासनाचा निषेध केला. कार्यकर्ते घुसण्याचा प्रयत्न करू लागल्यानंतर पोलिस व कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. तसेच दोन कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी बोलून सर्वांना आत सोडतो, शांततेत बोला असे आवाहन केले. परंतु प्रमुख पदाधिकारी आत गेल्यानंतर पुन्हा गेट बंद करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाल्यावर पुन्हा एकदा पोलिसांबरोबर वादावादी आणि धक्काबुक्की झाली. शेवटी सर्व कार्यकर्त्यांना आत घेण्यात आले व कार्यकर्त्यांनी मुख्य दरवाजाच्या आत ठाण मांडले.



त्यानंतर उपायुक्त रमाकांत आडसूळ हे कार्यकर्त्यांशी चर्चा करावयास आले. त्यावेळी पुन्हा एकदा प्रदीप उलपे, राजू मोरे, संजय सावंत यांनी त्याला धारेवर धरले. पर्यावरणाला हानी पोहोचवत कचरा पसरवून गुन्हा करणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट का रद्द केले नाही, अधिकार्यांावर कारवाई का केली नाही आणि टाकलेला कचरा का उचलला नाही याची उत्तरे द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. उपयुक्तांनी पूर्वी दिलेली उत्तरे देण्यास सुरुवात केल्यावर त्यांना थांबवून पुढील कारवाई कधी करणार असे विचारले. त्यावर उपायुक्तांनी अधिकार्यांउचे निलंबन व कंत्राटदाराचे कंत्राट समाप्ती हे विषय प्रशासकांच्या अखत्यारीतील आहे असे सांगितले. हे ऐकून कार्यकर्त्यांनी त्यांना प्रशासन यांची तातडीने मीटिंग लावा अशी मागणी केली. तसेच ज्या ठिकाणी कचरा टाकला आहे ती ठिकाणे तपासून तो कचरा त्वरित हटवा अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना उपायुक्तांनी दोन दिवसात बैठक ठरवू, उद्या दुपार नंतर कचरा टाकलेल्या ठिकाणी ट्रायल पीट घेऊन कचरा उठाव करावयास लावू आणि निलंबनाची प्रक्रिया सुरू असलेल्या आरोग्य निरीक्षकास बावड्यातून अन्य ठिकाणी बदली करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याची घोषणा राहुल चिकोडे यांनी केली. यावेळी दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, विजय आगरवाल, संतोष भिवटे, दिग्विजय कालेकर, भरत काळे, विवेक कुलकर्णी, आशिष कपडेकर, अशोक जाधव, अद्वेत सरनोबत, राहुल घाटगे, नरेश जाधव, रमेश दिवेकर, दिलीप बोंद्रे, अशोक लोहार, अतुल चव्हाण, गिरीश साळोखे, प्रकाश घाटगे, वल्लभ देसाई, प्रवीण शिंदे, विश्वजित पवार, अभय तेंडुलकर, सुशांत पाटील, संदीप कुंभार, विशाल शिराळकर, विजय दरवान, गायत्री राउत, विद्या बनछोडे, मंगला निप्पाणीकर, सुजाता पाटील, राधिका कुलकर्णी, ओंकार घाटगे, अनिल कामत, राजेंद्र वडगांवकर, सुनील पाटील, शाहरुख गडवाले, कोमल देसाई, सचिन सुतार, साजन माने, इक्बाल हकीम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 


Comments