दगडू आणि पालवीच्या मैत्रीची गोष्ट आहे खास, पुन्हा एकदा होणार फुल ‘टाइमपास’

 दगडू आणि पालवीच्या मैत्रीची गोष्ट आहे खास, पुन्हा एकदा होणार फुल ‘टाइमपास’




२९ जुलैला ‘टाइमपास ३’ होणार प्रदर्शित 

कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क

'टाइमपास' म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू आणि प्राजूची आगळीवेगळी प्रेमकहाणी. पहिल्या भागात अधुरी राहिलेली दगडू- प्राजूची प्रेमकहाणी दुसऱ्या भागात पूर्ण झाली. मात्र पहिल्या भागात प्राजूपासून दुरावलेल्या दगडूचे मधल्या काळात काय झाले? त्याच्या आयुष्यात कोणी नवीन मुलगी आली? दगडूच्या आयुष्यात काही बदल झाला का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘टाईमपास ३’मध्ये पाहायला मिळणार आहेत. झी स्टुडिओज, अथांश कम्युनिकेशन निर्मिती आणि रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपटाच्या टिझरने आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये यापूर्वीच उत्सुकता निर्माण केली. चित्रपटाबद्दलची हीच उत्सुकता आणि उत्कंठा ट्रेलरमधून आता अधिकच वाढली आहे. 



टाइमपासच्या दोन्ही भागात प्रेक्षकांना दगडू आणि प्राजूची सुंदर प्रेमकथा पाहायला मिळाली होती. या भागातही प्रेक्षकांना प्रेमकथा पाहायला मिळणार आहे मात्र यावेळी दगडूसोबत असणार आहे पालवी. आणि ही पालवी साकारली आहे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने. यापूर्वी हृताचा डॅशिंग अवतार टिझर मधून प्रेक्षकांनी पाहिला आहेत. आता ट्रेलरमधून तिची 'लव्हेबल' अदाही पाहायला मिळत आहे. चित्रपटात दगडूच्या भूमिकेतील प्रथमेश परब आणि पालवी हृता दुर्गुळेसोबतच, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत तर संगीत अमितराज यांचे आहे. चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून त्यांच्यासोबतीने प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि सवांद लिहिले आहेत. 


'टाइमपास ३' बद्दल रवी जाधव म्हणाले की, "टाइमपासच्या पहिल्या भागात शेवटी दगडू म्हणतो की 'आपण शिक्षणाचा ब्रिज घेऊन प्राजूपर्यंत पोहोचणार' दुसऱ्या भागाची सुरुवात एक यशस्वी उद्योजक बनलेल्या दगडूच्या गोष्टीपासून झाली होती. या दोन्हीच्या मधला नेमका दगडूचा प्रवास कसा होता ? यात कोणती वळणे आलीत ? हे सांगायचे राहून गेले होते. तेच सर्व धमाल पद्धतीने सांगण्यासाठी आम्ही 'टाइमपास ३' चा घाट घातला. माझ्या मते एखाद्या चित्रपटाचा पूर्वार्ध(प्रिक्वेल) आणि उत्तरार्ध (सिक्वेल) प्रदर्शित झाल्यानंतर अशी मधली गोष्ट सांगणारा भाग आणणे हा प्रयोग मराठीत पहिल्यांदाच होत असेल. पहिल्या दोन भागांप्रमाणे हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास आहे."


येत्या २९ जुलैला ‘टाइमपास ३’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Comments