देवस्थान समितीच्या प्रलंबित विकास कामे, प्रस्तावित आराखड्यांसंदर्भात मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करू : श्री.राजेश क्षीरसागर
देवस्थान समितीच्या प्रलंबित विकास कामे, प्रस्तावित आराखड्यांसंदर्भात मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करू : श्री.राजेश क्षीरसागर
नवरात्रोत्सव तयारी आणि प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
कोल्हापूर दि.२२ सिटी न्यूज नेटवर्क
गत चार ते पाच वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. परंतु, सदर कामे मुदतीत पूर्ण होत नाहीत त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. ऐन नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक श्री अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. येणाऱ्या भाविकांना मुलभूत सोईसुविधा देणे देवस्थान समितीची जबाबदारी त्याअनुषंगाने या नवरात्रोत्सवात भाविकांची गैरसोय होवू नये, कोणतीही तक्रार येवू नये, याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. स्थानिक व्यापाऱ्यांचाही या काळात व्यवसाय व्हावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. देवस्थान समितीची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावीत आणि प्रस्तावित आराखड्यांच्या प्रती सादर कराव्यात. याबाबत लवकरच मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून मंत्रालय स्थरावर बैठक लावू, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. नवरात्रोत्सव तयारी आणि प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीच्या सुरवातीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, येत्या नवरात्रोत्सवात देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी पार्किंग, मंडप व्यवस्था, स्वच्छतागृह, मंदिर परिसरातील दुकानदारांच्या समस्या, सुरक्षा रक्षकांकडून भाविकांशी होणारे वाद, भाविकांच्या मालमत्तेची सुरक्षा, देवस्थान समिती अंतर्गत सुरु असलेली विकासकामे, त्यातील प्रलंबित कामे, प्रस्तावित विकास कामे आदीबाबत माहितीची विचारणा केली.
याबाबत माहिती देताना देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी, भाविकांच्या वाहनासाठी सुमारे ११ ठिकाणी पार्किंग जागांचे नियोजन करण्यात आले आहे. यासह गांधी मैदान, राजर्षी शाहू स्टेडियम व छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे अतिरिक्त जागांची मागणी करण्यात आली आहे. पार्किंग ठिकाणीच भाविकांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले जाणार आहे. मंदिर परिसरापासून दूर अंतरावर असणाऱ्या पार्किंगच्या ठिकाणाहून के.एम.टी.बसेस उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे. यावर्षी व्यापाऱ्यांच्याशी संवाद साधून मंदिर परिसरातील कोणतेच रस्ते बंदिस्थ करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर परिसरात १०० सी.सी.टी.व्ही. द्वारे लावून भाविकांच्या सुरक्षिततेवर करडी नजर ठेवली जाणार आहे. भाविकांसाठी मोफत दर्शनासह दररोज १००० पेड दर्शन पासची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवसाच्या अनुभवावर दुसऱ्या दिवशीपासून पेड दर्शन पासची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुरक्षा रक्षकांना भाविकांशी योग्य वर्तन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कोणतेही गैरवर्तन केल्यास तात्काळ सेवेतून निलंबित करण्याचा सूचना दिल्या आहेत. देवस्थान समिती अंतर्गत सुरु असलेली कामे गेल्या दोन वर्षात कोव्हीड संसर्गामुळे प्रलंबित पडली असून, त्यातील श्री जोतीबा मंदिर येथे दर्शन मंडप आणि स्वच्छता गृहाचे काम दिलेल्या वाढीव मुदतीत पूर्ण होईल. इतर विकासकामे ही तांत्रिक बाबीची पूर्तता करून सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. श्री क्षेत्र जोतीबा मंदिर परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचपद्धतीने श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची आवश्यकता आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास निधी यासह मंदिर परिसरात भाविकांना मुलभूत सोईसुविधा देण्याकरिता आवश्यक विकास कामांचे आराखडे नियोजन विभागाच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. श्री अंबाबाई मंदिरातील दर्शन मंडपासाठी तीन जागांची चाचपणी सुरु असून, संबधित विभागांशी चर्चा सुरु आहे. यासह मंदिर परिसरातील व्यापारी वर्गाशीही चर्चा करून जागेचा विषय मार्गी लावण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, नवरात्रोत्सव काळात मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात पूर्वापार कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांनाही सामावून घ्यावे. मंदिर परिसरात होणाऱ्या चोऱ्या, पाकीटमारी आदी बाबत रेकॉर्डवरील सराईत गुंडांना ताब्यात घेण्याबाबत पोलीस प्रशासनास सूचना कराव्यात. फिरस्त्यांकडून भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आगामी काळात काम रखडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. यासह देवस्थान समितीच्या प्रलंबित विकास कामांसह, प्रस्तावित केलेल्या आणि आवश्यक असलेल्या आराखड्यांच्या व प्रस्तावांच्या प्रती सादर कराव्यात. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेवून लवकरात लवकर मंत्रालय स्तरावर विशेष बैठक लावून देवस्थान समितीस आवश्यक निधीबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासित केले.
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, देवस्थान समितीचे उप- अभियंता सुयश पाटील, लेखापाल धैर्यशील तिवले, वास्तुविशारद राजेंद्र सावंत, वास्तुविशारद मनोज पंडीत, रणजीत निकम, ठेकेदार संकल्प पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment