आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मदुराई निवासिनी मीनाक्षी या रूपामध्ये
कोल्हापूर 29 सिटी न्यूज नेटवर्क
शारदीय नवरात्र महोत्सवाचा आज चौथा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मदुराई निवासिनी मीनाक्षी या रूपामध्ये सजलेली आहे . भारतामध्ये पार्वतीच्या तीन सौंदर्यवती अवतारांचे वर्णन केले जाते. काशीची विशालाक्षी कांचीची कामाक्षी आणि मदुराईची मीनाक्षी.
मीनाक्षी म्हणजे मासोळीप्रमाणे डोळे असणारी. पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करणाऱ्या पांड्यराजा मलयध्वज यांच्या यज्ञातून एक तीन वर्षाची आयोनिजा कन्या प्रगट झाली. या कन्येचे वैशिष्ट्य म्हणजे हिला जन्मतः तीन स्तन होते भगवान शंकरांनी आकाशवाणीने कथन केले की या कन्येचा पुत्रवत सांभाळ करा. ज्यावेळेस ही कन्या उपवर होईल तेव्हा पती दर्शनाने तिचा तिसरा स्तन नष्ट होईल मलयध्वज राजाने शिवाची आज्ञा अक्षरशः पाळली. राजाच्या निधनानंतर राज्याधिकारी म्हणून मीनाक्षीला सिंहासनावर बसवण्यात आले. पित्याच्या साम्राज्याचा विस्तार आणि स्वतःचे वर संशोधन अशा दुहेरी कारणासाठी मीनाक्षी दिग्विजयाला निघाली .पार्वतीचा अंश असणाऱ्या मीनाक्षीच्या हातून एक एक राजा पराभूत होत गेला.. मीनाक्षीची विजय यात्रा कैलास पर्वतापर्यंत पोहोचली नंदी शृंगी भृंगी यांचा पराभव केल्यानंतर साक्षात आशुतोष भगवान शंकर युद्धाला आले. त्रिनेत्र शिवाची दृष्टी पडताच मीनाक्षीचा तिसरा स्तन अदृश्य झाला आणि मीनाक्षीला आपल्या पतीची ओळख पटली.तेव्हा आपल्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव भगवान शंकरांपुढे ठेवून मीनाक्षी मदुराईला आली. मीनाक्षीचा पत्नी रूपात स्वीकार करण्यासाठी भगवान शंकर सुंदरेश्वर रूपाने मदुराईला आले. भगवान विष्णूंच्या साक्षीनं मीनाक्षी आणि सुंदरेश्वराचा विवाह झाला. आजही मदुराई नगरीमध्ये वैशाख महिन्यात मीनाक्षीचा कल्याणोत्सव संपन्न होतो. मंदिर शास्त्राच्या दृष्टीने अतिशय देखण्या आणि विस्तीर्ण अशा मंदिरामध्ये मीनाक्षीची उजव्या हातामध्ये पुष्पगुच्छ त्यावरती पोपट ,डावा हात गजहस्तमुद्रेमध्ये अशा प्रकारची सुंदर मूर्ती विराजमान आहे. अशा या मधुरेश्वरीच्या नयन मनोहर रूपामध्ये सजलेली करवीर निवासिनी ची आजची अलंकार पूजा साकारली आहे अनिल कुलकर्णी आशुतोष कुलकर्णी श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी
विशेष आभार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः
Comments
Post a Comment