बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद उद्या सीमाबांधवांच्या पाठीशी उभी दिसेल : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर

 बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद उद्या सीमाबांधवांच्या पाठीशी उभी दिसेल : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर

 


महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलानात बाळासाहेबांची शिवसेना हजारोंच्या संख्येने सामील होणार : शिवसैनिकांच्या बैठकीत निर्धार


कोल्हापूर दि.२५ सिटी न्यूज नेटवर्क

 सन १९५६ मध्ये निपाणी ,बिदर, बेळगाव या शहरासह ८६५ खेड्यांचा समावेश कर्नाटक राज्यात करण्यात आला. सीमाभागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला. भाषिक बहुसंख्य मुद्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या मात्र बेळगाव सीमाप्रश्नात हा मुद्दा विचारातच घेण्यात आला नाही, असं आजही म्हटलं जातं. त्यातून सीमावादाचा लढा उभा राहिला. तेव्हापासून मराठी भाषिक जनतेचा सीमाप्रश्नाचा सुमारे ६६ वर्षांचा हा लढा सुरू आहे. सिमावासियांवर होणाऱ्या अन्याया विरोधात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळसाहेब ठाकरे यांनी नेहमीच आवाज उठविला आहे. सीमा लढ्यात शिवसेनेने ६९ हुतात्म्ये दिले तर स्वत: शिवसेनाप्रमुखांनी कारावास भोगला आहे. सीमावादाची पहिली प्रतिक्रिया नेहमीच कोल्हापुरातून उमटली असून, सीमा वासीयांच्या पाठीशी कोल्हापूरचे शिवसैनिक नेहमीच उभे राहिले आहेत. सीमाबांधवांच्या वतीने उद्या दि.२६ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद सीमाबांधवांच्या पाठीशी उभी दिसेल, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. सीमाबांधवांना पाठींबा देण्याकरिता महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सामील होण्याचा निर्धार शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित बैठकीत करण्यात आला.  

या वेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने  सकारात्मक भूमिका घेतली असून, राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्यात आली. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेप्रमाणे प्रथमच दोन्ही राज्याच्या राज्यपालांची आणि कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची बैठक पार पडली आहे. याचा पुढील टप्पा म्हणून मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना.मा.देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेवून सीमा प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठीचे पहिले पाऊल टाकले आहे. सीमा प्रश्न हा शिवसेनाप्रमुखांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मराठी माणसांच्या पाठीशी फक्त आणि फक्त शिवसेनाच वेळोवेळी उभी राहिली असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेनाच सीमा प्रश्न मार्गी लावेल. मराठी बांधवांच्या स्वाभिमानाच्या लढ्यात शिवसैनिक मागे राहणार नाहीत. शहरासह जिल्ह्यातून मोटरसायकल रॅली द्वारे शिवसैनिक सकाळी १०.०० वाजता शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ येथे दाखल होतील. याठिकाणाहून एकत्रितपणे सीमा बांधवांना पाठींबा देण्याकरिता हजारोंच्या संख्येने शिवसैनिक दसरा चौक येथे जाणार आहेत. सीमाबांधवांना पाठींबा देण्याकरिता जिल्हा व शहरातून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी मोठ्या ताकतीने उपस्थित रहावे, अशा सूचनाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केल्या.    

या बैठकीस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, उप-जिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, प्रा.शिवाजी जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पियुष चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  



Comments