दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर, ४ सिटी न्यूज नेटवर्क
दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिदिन पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता गुरुचरित्र पारायण, सकाळी १० ते १२ लघुरुद्र अभिषेक, दुपारी १२.३० वाजता महापूजा आणि महानैवेद्य यांसह अन्य कार्यक्रम होत आहेत. ७ डिसेंबरला दुपारी ४ ते ५ कीर्तन आणि मुख्य मंदिरात सायंकाळी ५ वाजता ‘श्री’ंचा जन्मकाळ होणार आहे. जन्मकाळानंतर मुख्य मंदिरातील श्रींचा पाळणा भक् तांच्या दर्शनासाठी ८ डिसेंबरअखेर पूर्ण दिवस श्री. अवधूत नारायण पुजारी घाटे(घाटे वाडा) मधली गल्ली, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ठेवण्यात येणार आहे.
कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान येथे प्राचीन श्री दत्तात्रेयांची मूर्ती असून तेथे ७ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजून ५१ मिनिटांनी उत्सव होणार आहे. रात्री ८ वाजता पालखी सोहळा असून ८ डिसेंबरला सकाळी ९ ते १२ नगरप्रदक्षिणा आणि दुपारी १ नंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.


Comments
Post a Comment