किमान वेतन, पी एफ साठी टिप्परचालकांचे अंबाबाईला साकडे

 किमान वेतन, पी एफ साठी टिप्परचालकांचे अंबाबाईला साकडे



कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क

शहरातील कचरा उठाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टिप्पर वर काम करणारे वाहनचालक महानगरपालिकेने कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. स्पर्धात्मक बोलीच्या नावाखाली महापालिका अधिकाऱ्यांनी किमान वेतनाच्या नियमालाच बगल देत टेंडर मंजूर केल्यामुळे कंत्राटदाराला किमान वेतन देणे शक्य नाही. परिणामी टिप्परचालकांना तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. कंत्राटदराने भविष्य निर्वाह निधीची रक्कम थकवली आहे. या सर्व प्रश्नांना घेऊन आम आदमी पार्टीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे.


आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबाबाई देवीस साकडे घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. टिप्परचालकांनी मंदिर परिसरात दंडवत घातले. किमान वेतन देण्यासाठी महापालिकेला सद्बुद्धी दे, थकीत पी एफ ची रक्कम जमा होऊ दे, टिप्परचालकांच्या अडचणी सोडव असे साकडे देवीकडे घालण्यात आले. 


ठेकेदाराने इ एस आय कार्ड देण्याचे मान्य केले आहे, थकीत पी एफ ची रक्कम वर्ग केली जाईल असे आश्वासन दिले आहे. परंतु अद्याप रक्कम जमा झाली नसल्याने आम्ही आंदोलन सुरू ठेवत आहोत. किमान वेतनाबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा शहर संघटक सूरज सुर्वे यांनी दिला.


यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, शशांक लोखंडे, समीर लतीफ, राजेश खांडके, उमेश वडर, प्रथमेश सूर्यवंशी, युवराज कवाळे, संजय राऊत, नितीन कवाळे, जयसिंग चौगुले आदी उपस्थित होते.

Comments