शहरातील स्वच्छतागृहांच्या समस्यांवर 'आप' महिला आघाडीची महापालिकेत बैठक, उपायुक्त रविकांत आडसूळ यांना दिले निवेदन
शहरातील स्वच्छतागृहांच्या समस्यांवर 'आप' महिला आघाडीची महापालिकेत बैठक, उपायुक्त रविकांत आडसूळ यांना दिले निवेदन
कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क
शहरातील महिला स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची हेळसांड होते. सोबतच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी महिला आघाडीच्या वतीने शहरातील एकोणीस स्वच्छतागृहांचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये स्वच्छतागृहांमधील स्वच्छता, लाईट, पाण्याची सोय, सुरक्षितता आदी सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. बहुतांश स्वच्छतागृहांमध्ये लाईट व पाण्याचा अभाव आहे. ई-टॉयलेट्स बंद आहेत. अस्वच्छतेमुळे स्वच्छतागृहांचा वापर करणे शक्य होत नाही.
या सर्व्हेमध्ये तपासण्यात आलेल्या मुद्यांच्या निष्कर्षांवर चर्चा करून सूचना देण्यासाठी महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये स्वच्छतागृहांची नियमित सफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, त्याची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, कमर्शियल कॉम्प्लेक्स मधील कुलूप लावलेले स्वच्छतागृहे खुली करण्यात यावेत, बंद ई-टॉयलेट सुरू करावेत, नामवंत आर्किटेक्ट नेमून शौचालयांचे स्टॅंडर्ड डिझाईन बनवावेत, स्वच्छतागृहात लाईट-पाण्याची सोय करण्यात यावी, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी अजेंसी नेमण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या. यावर उपायुक्त आडसूळ यांनी ऍक्शन प्लॅन तयार करू, बदल लवकरच दिसतील असे सांगितले.
सर्व सोयीनियुक्त व वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे करण्यासाठी येणाऱ्या बजेटमध्ये महिला स्वच्छतागृहांसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील यांनी केली.
यावेळी महिला संघटक पल्लवी पाटील, साक्षी देसाई, डॉ. उषा पाटील, स्मिता चौगुले, पूजा आडदांडे, उषा वडर, अभिजित कांबळे, आनंदा चौगुले, उत्तम पाटील, उमेश वडर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment