स्वतःला बदला तरच समाज बदलेल : डॉ. एस. एच. सावंत
शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये ‘अंकुरम २०२३’ मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
पुस्तकी ज्ञानाच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांनी कौशल्ये आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे. कौशल्यावर आधारित संधी मिळायला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपल्या शिक्षणातून समाजोपयोगी कार्य घडविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केल्यास भारत महासत्ता होण्याचे स्वप्न आपण लवकरच पूर्ण करू शकतो असा विश्वास एस. जी. एम. कॉलेज गडहिंग्लजचे प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी व्यक्त केला. बदलत्या काळासोबत राहून, चिंतन करत, शिक्षकांनी दिलेली मुल्ये जपल्यास निश्चितपणे अधिक झपाट्याने देशाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले. येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये आयोजित अंकुरम २०२३ या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुधसाखर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुधीर कुलकर्णी होते. मराठी राजभाषा गौरव दिन आणि विज्ञान दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. सागर शेटगे व प्रा. समाधान पोवार यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपले जीवन अधिक सोपे झाले आहे. त्याचा योग्य आणि सकारात्मक वापर करावा असे मत प्रा. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मोबाईल उपकरणाचा आवश्यक तितकाच वापर करावा. शिक्षण, संशोधन यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल. परंतु मोबाईलच्या गैरवापराने होणारी गुन्हेगारी कृत्ये, सायबर क्राइम अशा घटनांपासून सावधान राहावे असे मत दै. सकाळचे छायाचित्रकार बी. डी. चेचर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेमध्ये आझादी पाटील आणि तृप्ती उणे, पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेमध्ये धरम चंदनशिवे आणि सुप्रिया पाटील, विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये अमिषा कांबळे आणि श्रेया सुतार, सी-प्रोग्रामिंग स्पर्धेमध्ये आदित्य भेंडवडेकर आणि साहिल माळवी, सलाड डेकोरेशन स्पर्धेमध्ये सानिका पाटील आणि सानिका खाडे अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य प्रा. धनाजी रेपे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील, प्रा. वैभव कुंभार, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होत्या. सूत्रसंचालन तृप्ती उणे हिने केले तर आभार प्रा. दिग्विजय कुंभार यांनी मानले.
Comments
Post a Comment