कोल्हापूर वैद्यकीय क्षेत्रात आत्मनिर्भर ; डॉ. रघुनाथ माशेलकर

 कोल्हापूर वैद्यकीय क्षेत्रात आत्मनिर्भर ; डॉ. रघुनाथ माशेलकर



कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शताब्दी महोत्सवास शुभारंभ


कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

 कोल्हापूर देखील आता वैद्यकीय क्षेत्रात आत्मनिर्भर बनले आहे. आता अनेक आजारांवर येथे आधुनिक उपचार पद्धती व निदान उपलब्ध झालेले आहे. उपचारांसाठी रुग्णांना पुण्या मुंबईकडे जाण्याची गरज नाही . इथल्या कुशल डॉक्टरांमुळे सर्व वैद्यकीय सेवा सुविधा आता कोल्हापूरमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. याचे संपूर्ण श्रेय कोल्हापूर मेडिकल असोसिएशनला दिले पाहिजे. असे प्रतिपादन पद्मविभूषण शास्त्रज्ञ व देशाचे पेटंट मॅन ,थोर मानवतावादी विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. माझं नाव माशेलकर बदलून कोल्हापूरकर करावे अशी माझी तीव्र इच्छा होत आहे. इतकं प्रेम मला कोल्हापूरने दिले आहे. या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. याचबरोबर कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे कार्य देखील कौतुकास्पद आहे. कोरोना काळात भारताने एकजूट दाखवली. औषधे, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय, लस या भारताने स्वतः निर्मित केल्या. त्यामुळे भारत हा स्वावलंबी बनला. वैद्यकीय क्षेत्रातील खाजगी क्षेत्राचाही यामध्ये मोलाचा वाटा आहे. तसेच भारताच्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्र विकसित होत आहे. पण त्यात आधुनिक तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्र लवकर विकसित होत गेले. नेहमी जगाच्या पुढे जाऊन विचार केला पाहिजे. फक्त अनुकरण करण्यापेक्षा नेतृत्वावर भर देणे आवश्यक आहे. विचार हा सर्वसमावेशक असला पाहिजे. समाजाचा विचार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच आपण पुढे जाऊन काय करणार आणि मागे काय केले याचे सिंहावलोकन केले पाहिजे. इंडियापेक्षा खरा भारत हा खेड्यांमध्ये राहतो. त्यामुळे भारताच्या अमृत महोत्सवानिमित्ताने या भारताचा विचार होणे आवश्यक आहे. भारतापेक्षाही प्रगत देशांमध्ये  आधुनिक उपचार व निदान पद्धती आहेत. याचे संशोधन भारतात देखील व्हायला पाहिजे. व जे संशोधन करतात त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांचे संशोधन हे भारताच्या विकासामध्ये हातभार लावू शकते. भारताला आत्मनिर्भर करण्याबरोबरच संशोधन करणाऱ्यांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान होईल यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजेत. भारतात अति प्राचीन असे आयुर्वेद शास्त्र आहे. हेच आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक शास्त्र एकत्र येण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, अशी आशा डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.



     कोल्हापुरातील सर्व वैद्यकीय संघटनांची शिखर व अग्रणी संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा असोसिएशन शताब्दीच्या उंबरठ्यावर उभी आहे. सर्व वैद्यकीय संघटनांची ही मातृसंस्था आहे. निरंतर वैद्यकीय शिक्षण, केएमए कट्टा, बाल आरोग्य केंद्र, ज्येष्ठांसाठी आरोग्य केंद्र, स्त्री आरोग्य केंद्र मार्फत लसीकरण मोहीम, बायो मेडिकल वेस्ट प्रोग्रॅम असे अनेक उपक्रम कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने अविरतपणे राबविले जात आहेत. तसेच केएमए ला उत्कृष्ट शाखेचा सन्मान देखील मिळालेला आहे. कोरोना आणि महापुराच्या काळात  डॉक्टरांनी अखंडीतपणे रुग्णसेवा दिली आहे. शताब्दी महोत्सव लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तरी लोकांनी या लोकोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.गीता पिल्लाई यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात केले. 



शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. अजित चांदेलकर यांनी उद्देश स्पष्ट केला.शताब्दी महोत्सवाचे कार्यवाह डॉ. उद्धव पाटील यांनी शताब्दी महोत्सवात होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.माजी अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मंचावर डॉ. ए.बी.पाटील, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. रविंद्र कुटे, डॉ. उद्धव पाटील, डॉ. अजित चांदेलकर, डॉ. संतोष कदम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अमर अडके यांनी केले तर आभार डॉ. ए.बी. पाटील यांनी मानले.

Comments