कोल्हापूर येथे फुटबॉल अकादमीचा प्रस्ताव सादर करा : मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे नगरविकास सचिवांना सूचना
कोल्हापूर येथे फुटबॉल अकादमीचा प्रस्ताव सादर करा : मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे नगरविकास सचिवांना सूचना
श्री.राजेश क्षीरसागर यांची मागणी
कोल्हापूर दि.२२ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शहर हे कलानगरीसह क्रीडानगरी आणि कुस्तीपंढरी बरोबरच "फुटबॉल पंढरी" म्हणून संबोधले जाते. कोल्हापूर शहरातील फुटबॉल खेळास सुमारे १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. स्वातंत्र पूर्व काळापासून कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळला जात असून, स्वातंत्र पूर्व काळातील अनेक फुटबॉल संघ शहरात आहेत. असा हा फुटबॉल खेळ कोल्हापूरची जीवनवाहिनी असून, देशात कोलकत्ता नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रेक्षकवर्गही कोल्हापुरच आहे. परंतु, सुसज्ज मैदान, तंत्रशुद्ध प्रशिक्षण या अभावी कोल्हापूरसह आसपासच्या भागातील फुटबॉल खेळाडूंच्या प्रशिक्षणावर आणि खेळावर मर्यादा येत आहेत. यामुळे अनेक फुटबॉलपट्टू स्थानिक संघासहपुरते मर्यादित राहिले आहेत. तर ठराविक खेळाडू पुणे, मुंबई, गोवा, कलकत्ता आदी ठिकाणच्या नामांकित क्लब कडून खेळत आहेत. या खेळाडूंना कोल्हापुरातच सुसज्ज मैदान आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्राप्त होण्यासाठी फुटबॉल अकादमी होणे आवश्यक आहे. त्यानुसार शेंडा पार्क येथे उपलब्ध असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २५० एकर जागेतील १६ एकर जागेत फुटबॉल अकादमीचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास निधी मंजूर करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याअनुषंगाने मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास विभाग २ चे प्रधान सचिव श्री.ब्रिजेश सिंह यांना दिले आहे.
फुटबॉल खेळ कोल्हापूरवासीयांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. येथे स्थानिक स्पर्धांना मिळणारा प्रेक्षक वर्गाचा प्रतिसाद हजारोंच्या संख्येत आहे. गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरात आय लीग सारख्या स्तरावरील स्पर्धाही पार पडल्या आहेत. कोल्हापूरच्या अनेक फुटबॉलपट्टूनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून, गतवर्षी कोल्हापुरातील अनिकेत जाधवची भारतीय फुटबॉल संघात निवड झाली आहे. फुटबॉल खेळाला गती मिळावी. सुसज्ज मैदान, खेलासंबंधातील तंत्रशुद्ध प्रशिक्षक, इतर सोई-सुविधा खेळाडूंना प्राप्त व्हाव्यात याकरिता शहरात फुटबॉल अकादमी स्थापन करणे गरजेचे आहे. गत महिन्यात खासदार श्री.श्रीकांत शिंदे हे राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्याला उपस्थित होते. यावेळी खासदार श्री.श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापुरात फुटबॉल अकादमी स्थापन करण्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकरी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी फुटबॉल अकादमीचा आराखडा तयार करून तो मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सादर केला आहे. यामध्ये ऑलिम्पिक साईज फुटबॉल मैदान, खेळाडूंचे वसतिगृह, प्रशिक्षक, संरक्षक, सुरक्षा रक्षक यांची स्वतंत्र व्यवस्था, चेजिंग रूम, गेस्ट हॉल, वाहनतळ, दोन टर्फ मैदान, दोन टेनिस कोर्ट, स्विमिंग टंक, बॉक्स क्रिकेट ग्राउंड, हॉल, जिम, गादरिंग हॉल आदी सुविधा उपलब्ध आहेत.
यासंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली. यावर याअनुषंगाने मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास विभाग २ चे प्रधान सचिव श्री.ब्रिजेश सिंह यांना दिले आहेत.
याबाबत बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब राज्याचे विकासाचे व्हिजन घेवून मार्गक्रमण करत आहेत. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना फुटबॉल अकादमीची संकल्पना आवडली असून, याबाबत तेही आग्रही आहेत. कोल्हापूरातील फुटबॉल स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता कोल्हापूरसह आसपासच्या ग्रामीण भागातील खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करावेत. अनेक नामांकित खेळाडू कोल्हापुरातून तयार व्हावेत, यासाठी फुटबॉल अकादमी फायदेशीर ठरणार असून, आगामी काळात फुटबॉल अकादमी निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment