स्वच्छतागृहांच्या प्रश्नावर महापालिकेकडून टोलवाटोलवी | टेबल टेनिस खेळून महापालिकेचा आप ने केला निषेध
स्वच्छतागृहांच्या प्रश्नावर महापालिकेकडून टोलवाटोलवी
टेबल टेनिस खेळून महापालिकेचा आप ने केला निषेध
कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क
शहरातील महिला स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची हेळसांड होते. सोबतच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयावर आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकांमध्ये विस्तृत चर्चा होऊन देखील पुढे काम होत नाही. या प्रश्नावर अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी होत असल्याने याचा निषेध म्हणून महापालिकेसमोर टेबल टेनिस खेळून आंदोलन करण्यात आले.
शहरातील एकोणीस स्वच्छतागृहांचा आप कडून सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये स्वच्छतागृहांमधील स्वच्छता, लाईट, पाण्याची सोय, सुरक्षितता आदी सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. बहुतांश स्वच्छतागृहांमध्ये लाईट व पाण्याचा अभाव आहे. ई-टॉयलेट्स बंद आहेत. अस्वच्छतेमुळे स्वच्छतागृहांचा वापर करणे शक्य होत नाही.
स्वच्छतागृहांची नियमित सफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, त्याची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, कमर्शियल कॉम्प्लेक्स मधील कुलूप लावलेले स्वच्छतागृहे खुली करण्यात यावेत, बंद ई-टॉयलेट सुरू करावेत, नामवंत आर्किटेक्ट नेमून शौचालयांचे स्टॅंडर्ड डिझाईन बनवावेत, स्वच्छतागृहात लाईट-पाण्याची सोय करण्यात यावी, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी अजेंसी नेमण्यात यावी, या सारख्या मागण्यांवर त्वरित अमलबजावणी करावी, अन्यथा अधिकार्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागेल असे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
महापालिकेतील दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना याबाबत भेटून चर्चा केली गेली होती. परंतु समन्वयचा अभाव, कोणी कोणते काम करायचे याबाबत असलेली संभ्रमावस्था, हे काम आमच्याकडे येत नाही तुम्ही दुसऱ्या विभागात भेटा असे ते अधिकारी उत्तर देत असल्याने शेवटी आम्हाला हे आंदोलन करावे लागत असल्याचे महिला आघाडीच्या शहर संघटिका पूजा अडदांडे यांनी सांगितले.
यावेळी पल्लवी पाटील, स्मिता चौगुले, उषा वडर, स्नेहल पतके, साक्षी देसाई, इस्थेर कांबळे, जयश्री पाटील, सुनीता मोहिते, शुभांगी सोनवणे, सुरेखा सोनवणे, स्नेहल रायकर, विजया साळुंखे, सुनिता मोहिते, जयश्री कदम, आशा सोनवणे, मंगल कदम, सरिता पवार, हेमलता पवार, नीता पवार, वर्षा माने, श्रेया माने, स्नेहल पाटील, सीमा नलवडे, अनिता नलवडे, सविता तोडकर, मीनल मिस्त्री तसेच शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, प्रथमेश सूर्यवंशी, राकेश गायकवाड, संजय नलवडे, समीर लतीफ, सदाशिव कोकितकर, शशांक लोखंडे, उमेश वडर, महेश घोलपे, अमरसिंह दळवी, किशोर खाडे, मनोहर नाटकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment