अंबाबाईने सेवेची संधी दिल्यास देवालयासह भक्तांच्या सोयी -सुविधांसाठी नाविन्यपूर्ण काम करू : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

 अंबाबाईने सेवेची संधी दिल्यास देवालयासह भक्तांच्या सोयी -सुविधांसाठी नाविन्यपूर्ण काम करू   : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

      


          

मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते श्री. महालक्ष्मी भक्त मंडळाच्या गणपतीची आरती 

           

कोल्हापूर, दि. १९ सिटी न्यूज नेटवर्क 

करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवालय हे शक्तीपीठ आहे. आई अंबाबाईने सेवेची संधी दिल्यास देवालयाच्या विकासासह भक्तांच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण काम करून दाखवू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

       

श्री अंबाबाई मंदिर परिसरात श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या १३३ व्या  गणेशोत्सवाच्या आरतीचा शुभारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

             

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, श्री. महालक्ष्मी देवीची ख्याती संपूर्ण देशभर आहे. श्री महालक्ष्मी भक्त मंडळांनी अखंड १३३ वर्ष या गणेशोत्सवाची परंपरा मोठ्या भक्तीभावाने चालविली आहे. या मंडळाला अन्नछत्र आणि इतर बाबतीत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू.  या मंडळाच्या पाठीशी हिमालयासारखे उभे आहोत.

             

यावेळी बोलताना माजी आमदार श्रीमंत मालोजीराजे छत्रपती म्हणाले, महालक्ष्मी भक्त मंडळाच्या गणेशोत्सवाला एक आगळीवेगळी परंपरा आहे. मंडळांने धार्मिक परंपरा जोपासतानाच विधायक सामाजिक कार्यातून कोल्हापूरकरांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. जिथे सर्वसामान्याना समस्या असतात, तिथे मदतीसाठी भक्तमंडळ सदैव अग्रेसर असते. 

          

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, राजकारण हा विषय इथे नाही. दरम्यान;  मंत्री हसन मुश्रीफ यांचा दरबार सकाळी सहाला सुरू होतो. त्यांच्या या कामामुळेच आम्ही नेहमीच त्यांचा आदर करतो. जनतेच्या कामाचा माणूस म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर आहे. त्यामुळेच त्यांना खूप आशीर्वाद मिळतात. या गणपतीच्या आशीर्वादाने ते आणखीही मोठ्या पदावर जातील, असेही ते म्हणाले.

        

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, प्रा.  जयंत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास यांचीही भाषणे झाली.    

              

यावेळी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयाबाबा माने, प्रा. जयंत पाटील,  आदिल फरास, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेश जाधव, प्रांताधिकारी व श्री. अंबाबाई देवालय देवस्थान समितीचे प्रशासक सुशांत बनसोडे,  बाबासाहेब कांबळे, मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, उपाध्यक्ष विजय पवार, संजय जोशी, प्रमोद भिडे, सदानंद उर्फ नंदकुमार मराठे, अनिल जाधव, एस. के. कुलकर्णी, वैभव मेवेकरी, रणजीत मेवेकरी, संजय बावडेकर, मधुसूदन उर्फ किरण धर्माधिकारी, अमित जाधव, सुनील जोशी, सौ. हर्षदा मेवेकरी - जाधव, श्रीमती ज्योती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


Comments