देशाच्या सीमा सांभाळण्यात मराठा लाईट इन्फंट्री आघाडीवर : चंद्रकांत पाटील
तिटवे येथे शहीद सन्मान दिन साजरा
कोल्हापूर (तिटवे) २५ : सिटी न्यूज नेटवर्क
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट’चा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या पूर्वजांची ही कर्तबगारी आपल्याला माहिती हवी. आपण ती पुढच्या पिढीला सांगायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे ‘मराठा’चे दैवत आहे. बोल ‘श्री शिवाजी महाराज की जय’ ही त्यांची युद्धघोषणा आहे. आपण ‘शिवाजींचे बच्चे आहोत, आपल्यामुळे त्यांच्या नावाला बट्टा लागता कामा नये,’ हेच ‘मराठा रेजिमेंट’मध्ये नव्याने दाखल होणार्या प्रत्येकाला शिकवले जाते. चपळता, उत्तम शरीरसंपदा, काटकपणा, गनिमीकावा आणि युद्धकौशल्य यांच्या बळावरच ‘मराठा लाईट इन्फंट्री’ आज देशाच्या सर्व सीमा सांभाळण्यात आघाडीवर आहे आणि यापुढेही राहील. असे मत संशोधक पत्रकार चंद्रकांत पाटिल यांनी व्यक्त केले. चंद्रे येते शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित शहीद सीताराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
25 नोव्हेंबर 1971 रोजी बांगलादेश युद्धात शहीद सीताराम पाटील यांना वीरमरण आले होते. हा दिवस शहीद शिक्षण प्रसारक मंडळ शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला.यानिमित्त कोल्हापूर जिल्हयातील आजी-माजी सैनिकांचा सन्मान व वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई सिताराम पाटील होत्या.
इतिहासात गुंग होऊन वर्तमान वाया न घालवता त्याच इतिहासाच्या जोरावर आपण एक उज्वल भविष्य घडविणे गरजेचे आहे शिक्षणरुपी पेन ही नव्या जगाची तलवार आहे या तलवारीच्या सहाय्याने आपल्या युवा पिढीने जग जिंकायला हवे. असे मत शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ.जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे पर्यावरण संस्थेने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून हजारो रोपांची लागवड केली आहे. प्रत्येकाने अशाप्रकारे रोपे लावून पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावणे गरजेचे आहे.
चंद्रे येथे शहीद जवानांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याचा संकल्प आहे हे स्मारक पाहण्यासाठी देशभरातील जवान येथे यावेत यासाठी सर्व आजी-माजी सैनिकांचे आशीर्वाद मिळावेत असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी शाहीर अलीम कासार आणि सहकार्यांचा देशभक्तीपर शाहीरी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. विविध पोवाड्यांतून रणभूमीची गाथा ऐकायला मिळाली. शहीद सन्मान, देशभक्ती अशा विषयांवर पोस्टर प्रेसेंटेशन, रांगोळी व वकृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील यांनी केले. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, शहीद पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक प्रा. संतोष चौगुले, माजी सैनिक सुभेदार तानाजी खाडे, प्रा.अविनाश पालकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी परबकर, संजना पाटील यांनी केले तर आभार शहीद पब्लिक स्कूलच्या प्राचार्य ऐश्वर्या कवडे यांनी मानले .
Comments
Post a Comment