चिपळुणात ६ जानेवारी पासून कीर्तनमाला :ह.भ.प. आफळेबुवा छत्रपती शंभूराजेंची धगधगती शौर्यगाथा उलगडणार
चिपळूण ४ सिटी न्यूज नेटवर्क
दरवर्षी प्रमाणे आतुरतेने वाट पहात असलेल्या कीर्तनप्रेमींसाठींची भव्य कीर्तनमालेची तयारी अंतिम टप्प्यात असून उद्या शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता कीर्त़नमालेचा शुभारंभ कार्यक्रम होईल . राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती ह. भ.प. श्री. चारूदत्तबुवा आफळे यांचे अमोघ वाणीतील व्यासंगी विवेचन , सुश्राव्य संगीत साथीचे सादरीकरण व संयोजक श्री स्वामी चैतन्य परिवार, चिपळूण संस्थेचे दरवर्षी प्रमाणे नेटके , भव्यदिव्य संयोजन हे या भव्य कीर्तनमालेचे वैशिष्ट्य आहे. कै. खेडेकर क्रीडा संकुलातील भव्य कीर्तनमालेचा आस्वाद दिनांक ९ जानेवारी पर्यंत सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत रसिकांना घेता येणार आहे.
चिपळूण शहरातील नगरपालिकेसमोरील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात उद्या दिनांक ६ जानेवारी, शनिवार पासून सुरू होणारया कीर्तनमालेत स्वराज्याचे दुसरे छत्रपती , पराक्रमी सेनानी श्री शंभूराजे यांच्या दैदिप्यमान यशाची धगधगती किनार असलेली उत्तुंग शौर्यगाथा श्री.चारूदत्तबुवा आफळे सुश्राव्य संगीत साथीने उलगडणार आहेत. संगीत साथीदारांमध्ये श्री. गंगाधर देव ( आॅगॆन ) , श्री. प्रमोद जांभेकर ( व्हायोलिन ) , श्री. मिलिंद तायवाडे ( तबला ) , श्री. मनोज भांडवलकर ( पखवाज ) यांचा सहभाग आहे.
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवराय यांचा दैदिप्यमान इतिहासाचा वारसा समर्थपणे पेलणारे हिंदवी स्वराज्याचे व मराठ्यांचे दुसरे छत्रपती म्हणजेच श्री शंभूराजे ! औरंगजेबाच्या जुलमी राजवटीपासून स्वराज्याचे रक्षण करताना छत्रपती श्री शंभूराजे यांनी सलग आठ वर्षे कडवी झुंज देताना वयाच्या बत्तिसाव्या वर्षी प्राणाहुती दिली . आपल्या अल्प पण उत्तुंग कारकीर्दीत छत्रपती श्री शिवराय यांच्या हिंदवी स्वराज्यामधील एकही महत्वपूर्ण किल्ला व आरमार गमावले नाही. स्वराज्याचे दुसरे पराक्रमी सेनानी छत्रपती म्हणून श्री शंभूराजे यांच्या दैदिप्यमान इतिहासाला एक धगधगती किनार आहे .
रसिकांना ही धगधगती शौर्यगाथा ऐकण्याचा योग चिपळूण येथील श्री स्वामी चैतन्य परिवाराचे आयोजनातून लाभणार आहे. नेटके संयोजन असलेल्या भव्य कीर्तनमालेचे हे आठवे वर्ष आहे.
राष्ट्रीय कीर्तनकार , विद्यावाचस्पती ह.भ.प. श्री. चारूदत्तबुवा आफळे यांच्या अमोघ वाणीला सुश्राव्य संगीताची लाभलेली साथ , कीर्तन परंपरेला साजेसे व कीर्तन विषयाला अनुसरुन वातावरण निर्मिती असलेले नेटके रंगमंच नेपथ्य आणि सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश हे दरवर्षी प्रमाणे नियोजित भव्य कीर्तनमालेचे वैशिष्ट्य आहे.
उत्तुंग सह्याद्रीच्या निबीड अरण्यातील दरयाखोरयात आपल्या पराक्रमाने स्वराज्याच्या असंख्य शत्रू सोबत एकाचवेळी लढणारया शिवपुत्र , विचारी , कवी , धर्मवीर अशा अनेक लौकिकाचे पैलू असलेल्या छत्रपती श्री शंभुराजे यांच्या चित्तथरारक पराक्रमाची ही दैदिप्यमान गाथा ह.भ.प.श्री चारूदत्तबुवा आफळे यांच्या व्यासंगी विवेचनातून उलगडली जाणार आहे .
चिपळूण बापट आळी येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम उपासक परमपूज्य श्रीगुरूमाऊली सद्गुरू श्री वासुदेव दळवीकाकामहाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या आयोजक परिवाराकडून या भव्य कीर्तनमालेसाठी दरवर्षीप्रमाणे रसिकांना विनामूल्य प्रवेश असून बैठक व्यवस्थेतील व्यासपीठासमोरील काही आसनरांगा विशेष निमंत्रित व देणगीदार सन्मानिक प्रवेशिका यांच्याकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Comments
Post a Comment