सकारात्मक विचारच तुम्हाला प्रगतीपथावर नेतील : तंजावरच्या महाराणी ऐश्वर्या सरफोजी राजे भोसले यांचे प्रतिपादन

 सकारात्मक विचारच तुम्हाला प्रगतीपथावर नेतील : तंजावरच्या महाराणी ऐश्वर्या सरफोजी राजे भोसले यांचे प्रतिपादन 



कोल्हापूर (तिटवे) १६ सिटी न्यूज नेटवर्क 

छत्रपती शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्या वंशज ऐश्वर्या सरफोजी राजे भोसले यांचे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  मराठा साम्राज्य घडविताना सुद्धा अनेक संकटे आली. त्यातूनही मराठा राजांनी न खचता राज्य निर्माण केले. आपण नेहमी सकारात्मक विचार करून मार्गक्रमण केल्यास निश्चितपणे यशाला गवसणी घालू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी युवराज प्रतापसिंह राजे भोसले व अनुराधा सावंत-भोसले यांची विशेष उपस्थिती होती.


कावेरीच्या खोऱ्यात तंजावर मराठी राज्य स्थापनेच्या इतिहासावर त्यांनी प्रकाश टाकला. सरफोजीराजे दुसरे, सरस्वती महाल ग्रंथालय, मराठी नाटक, भरतनाटय़म् आणि पाककला या संदर्भात मराठी सम्राटांनी केलेल्या कामाबद्दलही  त्यांनी मार्गदर्शन केले. 

 

महाराष्ट्रापासून कोसो दूर तंजावरमध्ये गेली कित्येक शतके मराठी संस्कृती आकार घेत राहिली, ही नि:संशय विस्मयचकित करणारी बाब. याचे सारे श्रेय तंजावरच्या मराठय़ांकडे जाते. यात तंजावरचे राजे सरफोजी दुसरे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. मराठा साम्राज्यामध्ये स्त्रियांना विशेष स्थान होते. तेच स्थान पुन्हा मिळवून देण्यासाठी शहीद शिक्षण प्रसारक मंडळ कार्यरत आहे, असे प्रतिपादन आंतररष्ट्रीय शिक्षण तज्ञ डॉ.जगन्नाथ पाटील यांनी केले. 


   कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांनी केले. प्रा.दिग्विजय कुंभार, प्रा. गायत्री पाटील यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. सूत्रसंचालन तेजस्विनी परबकर यांनी केले तर आभार प्रा. सिद्धार्थ चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य सागर शेटगे, शिक्षकवृंद विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Comments