आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी तिटवे येथे केले ग्रामविकास आराखडा व सर्वेक्षण:अनंतराव पवार आर्किटेक्चर , पुणे यांचे शिबिर संपन्न
आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी तिटवे येथे केले ग्रामविकास आराखडा व सर्वेक्षण:अनंतराव पवार आर्किटेक्चर , पुणे यांचे शिबिर संपन्न
कोल्हापूर (तिटवे) १८ सिटी न्यूज नेटवर्क
अनंतराव पवार आर्किटेक्चर महाविद्यालय, पुणे, शहीद शिक्षण प्रसारक मंडळ, तिटवे व ग्रामपंचायत तिटवे, राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हिवाळी अभ्यास दौरा सुरु आहे. या अभ्यास दौऱ्याचे उद्घाटन वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, तिटवे गावच्या सरपंच सौ. अर्चना घारे, उपसरपंच यांच्या शुभहस्ते झाले.
सदर अभ्यास दौऱ्यासाठी प्रथम वर्ष आर्किटेक्चर व प्रथम वर्ष इंटिरियर डिझाईनचे ३० विद्यार्थी, प्राध्यापक व तिटवे गावचे ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गावातील मुख्य रस्त्याचे लँडस्केप डिझाईन व सुशोभीकरण, नदीवरील घाटाचा आराखडा, कुस्ती मैदान व बैठक व्यवस्था, बहुउद्देशीय समारंभाच्या जागेचा आराखडा, इत्यादी कामाचे सर्वेक्षण व ड्रॉइंग विद्यार्थी करणार आहेत. त्याचबरोबर गावातील ५० शेतकरी कुटुंबांचे ग्रामीण जीवनशैली अंतर्गत सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सुधारणांबद्दल सर्वेक्षण करून अहवाल शासनास सादर करणार आहेत.
सदर अभ्यास दौऱ्यासाठी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कोळी यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील, प्रा. वैभव घोडके, प्रा. सुचिता जवळकर, प्रा. प्रतीक लोंढे, शहीद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी सर्वेक्षण व यशस्वी नियोजन करून विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये सुसंवाद साधला.

Comments
Post a Comment