जोतिबा रोड वरील खरमाती हटवा - आप ची मागणी
कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क
श्री अंबाबाई मंदिर येथील जोतिबा रोड येथे भुयारी गटर योजनेचे काम सुरु आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खुदाई केल्याने या रस्त्यावर खरमाती व मलब्याचे ढीग साचले आहेत. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना कसरत करावी लागत आहे. तसेच परिसरातील दुकानांच्या समोरच खरमातीचे ढीग लावून ठेवल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आम आदमी पार्टीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेऊन निवेदन दिले.
जोतिबा रोडवरील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचे भाडे द्यावे लागते. संथगतीने सुरु असलेल्या खोदकामामुळे येथील व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे खरमाती त्वरित उचलून तेथे फेंसिंग करावे अशी मागणी आम्ही केली आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या रथोत्सवासाठी घाटी दरवाजा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे येथील गटारीचे काम त्यापूर्वी होणे गरजेचे असल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेश खांडके, अभिजित भोसले, समीर लतीफ व व्यापारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment