छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या कामातील भ्रष्टाचाराची गय केली जाणार नाही : राजेश क्षीरसागर यांचा इशारा
जिल्हा नियोजन समितीतून रु.२ कोटींचा निधी; क्षीरसागर यांच्याकडून कामाची पाहणी
कोल्हापूर दि.२५ सिटी न्यूज नेटवर्क
खेळाडूंचे नुकसान नको म्हणून आजपर्यंत चाललेल्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण राजकीय द्वेषापोटी निधी बाबत खेळाडू व नागरिकामध्ये गैरसमज पसरविण्याची बाब निंदनीय आहे. माजी पालकमंत्री ना.दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करून घेतला असताना, स्वत:चा आमदार फंड दिल्याच्या आविर्भावात उद्घाटन करून आयत्या पिठावर रांगोळ्या काढायच्या, स्वत: भ्रष्टाचाराला खतपाणी घालून दुसऱ्याच्या नावाने ओरडायचे. कमी दराच्या निविदा भरणाऱ्या ठेकेदारावर दबाव आणून निविदा मागे घेण्यास भाग पाडायचे आणि आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देवून भ्रष्टाचार करायचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. काम कोल्हापुरात आणि ठेकेदार मुंबईत? प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का? छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता असून, या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची गय करू नका. गैरमार्गाने मंजूर केलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी करून दोषी अधिकारी आणि त्यांना साथ देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याकडे भागातील खेळाडू आणि नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. याबाबत तात्काळ जिल्हा नियोजन समितीमधुन आवश्यक निधीची तरतूद करण्याची ग्वाही श्री.क्षीरसागर यांनी खेळाडूंना दिली होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी स्टेडियम सपाटीकरण, ड्रेनेज व इतर सोयीसुविधा करणे यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून रु.१ कोटी ९० लाख निधीची तरतूद करण्यात आली असून, या निधीतून सुरु असलेल्या कामाची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली. आज सकाळी श्री.क्षीरसागर यांनी भागातील प्रमुख तालीम संस्थाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत छत्रपती शिवाजी स्टेडियमला भेट दिली.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी स्टेडियम मैदानाची गेल्या काही वर्षापासून दुरावस्था झाली आहे. निधी अभावी मैदानाची झालेली दुरावस्था यामुळे खेळाडूंच्या सरावावर विपरीत परिणाम होत आहे. मैदानाचे सपाटीकरण, खेळाडूंसाठी मुलभूत सोई सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक खेळाडूनी नाराजी व्यक्त केली होती. दोन वर्षापूर्वी पाटाकडील तालीम फुटबॉल संघाच्या कार्यक्रमाकरिता आलो असताना, तालमीच्या पदाधिकाऱ्यांनी या मैदानाच्या सुधारणेसाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन पालकमंत्री मा.दीपक केसरकर यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रु.१ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर केला. परंतु, स्वत:चा आमदार फंड दिल्यासारखे या कामाचे श्रेय लाटण्याचा निरर्थक प्रयत्न केला जात आहे. या कामाचे उद्घाटन केले गेले, मैदानाचा विकास व्हावा म्हणून अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केले. पण, राजकीय बदनामी पोटी या कामाच्या माध्यमातून जनतेत गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे. चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून कॉंग्रेसच्या माजी पालकमंत्र्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यात आले. काम कोल्हापुरात तर ठेकेदार मुंबईत हीच कामाची पद्धत आहे काय? असा सवाल करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मंजूर निधीतून मैदानाच्या विकासाचे काम सुरूच ठेवावे. खेळाडूंना लवकरात लवकर मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी आपली भूमिका आहे. त्यामुळे काम थांबवू नका. नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष या नात्याने या कामाकडे आपले काटेकोरपणे लक्ष देणार असून, भ्रष्टाचार होवून शासन निधीचा अपव्यय करू दिला जाणार नाही. झालेल्या चुकीच्या निविदा प्रक्रियेची जिल्हाधिकारी यांच्या मार्फत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले जातील. त्यानुसार तात्काळ चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशा सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी नगरसेवक अशोक पोवार, शिवसेना उपशहरप्रमुख सचिन पाटील, राजू पाटील, रणजीत मंडलिक, अश्विन शेळके, श्रीकांत मंडलिक, पाटाकडील तालीम फुटबॉल संघाचे संपत जाधव, तुकाराम माळी तालमीचे शिवाजी पोवार, बालगोपाल तालमीचे राहुल चव्हाण, स्वरूप पिसे, सुबराव गवळी तालमीचे मिलिंद गुरव, उदय पाटील, सागर माळी, श्रीधर पाटील, सम्राट कपिल फुटबॉल क्लबचे विशाल पाटील, नितीन माळी, रामभाऊ कांबळे, संजय शिंदे चानी, विकास पायमल, किरण अतिग्रे, कैलास जाधव, सुरेश भोसले, कपिल हवालदार, विकास शिरगावे, दत्तात्रय माळी, शाम देवणे, बाबासो महालकरी, राहुल घोटणे, यांच्यासह भागातील खेळाडू, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"भ्रष्टाचार रोखण्याऱ्या वाघाला शेळी थांबवू शकत नाही"
निधी शासनाचा, ठेकेदार कॉंग्रेसच्या माजी पालकमंत्र्यांच्या मर्जीतला, निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार स्वत: करायाचा आणि राजकीय द्वेषातून इतरांच्या बदनामीचा डाव आखायचा. असले प्रकार कोल्हापुरात चालत नाही. मंगळवार पेठ, रविवार पेठ, उद्यमनगर परिसरातील खेळाडू आणि नागरिक अशा प्रकारांना भिक घालणार नाहीत. भ्रष्टाचार होत असेल चौकशी होवून कारवाई झालीच पाहिजे असे सांगत भ्रष्टाचार रोखणाऱ्या वाघाला शेळी थांबवू शकत नाही असा इशाराही उपस्थित खेळाडू व नागरिकांनी दिला.
Comments
Post a Comment