करवीर पीठाच्या उत्सवाची उत्साहाने सांगता


 


करवीर पीठाच्या उत्सवाची उत्साहाने सांगता

 कोल्हापूर येथील करवीर पीठाच्या उत्सवाची गुरुवारी सांगता झाली. यावेळी आमदार विनय कोरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. शेजारी स्वामी विद्यानृसिंह भारती, शिवस्वरूप भेंडे व रामकृष्ण देशपांडे.





कोल्हापूर, ता. २३ सिटी न्यूज नेटवर्क 

वाद्यांचा गजर, शंकराचार्यांच्या जयघोषात येथील शंकराचार्य करवीर पीठाच्या उत्सवाची आज मोठ्या उत्साहाने पालखी प्रदक्षिणेने सांगता झाली.


करवीर पीठाचे आद्य शंकराचार्यांच्या २५३२ व्या जयंती उत्सवास १८ मे रोजी सुरवात झाली. भजन, कीर्तन, अभिषेक, होम हवन आणि श्रीमत भागवत असे आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला.


दरम्यान, उत्सवाच्या शेवटी महाप्रसाद आणि पालखी प्रदक्षिणेने सांगती झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास गेली. तेथे स्वामीनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पालखी पुन्हा पीठात आली. पारंपरिक वाद्ये धनगरी ढोल, हलगी, लेझीम, घोडी, अब्दागिरी अशी मिरवणूक निघाली. रथातून स्वामीनी भक्तांना आशीर्वाद दिले.   त्यापूर्वी आमदार विनय कोरे यांच्या हस्ते पीठात पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री. कोरे यांनी पीठाच्या विविध उपक्रमाची माहिती घेतली व जरूर ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सचिव शिवस्वरूप भेंडे, रामकृष्ण देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

Comments