अवयवदान चळवळीला बळ देऊया : राजेश क्षीरसागर यांचे आवाहन
अवयवदान दिनानिमित्त सुप्रसिद्ध "स्टार" नाट्यप्रयोगातून जनजागृती
कोल्हापूर दि. २५ सिटी न्यूज नेटवर्क
माणुसकीच्या नात्याला घट्ट करणारी चळवळ म्हणजे अवयव दान चळवळ म्हणावे लागेल. कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून अवयवदानासंदर्भातील चळवळीला अधिक बळ मिळाले आहे. मात्र, अवयवदानासाठी आवश्यक असणारी यंत्रणा नसल्यामुळे अवयवदानाचा फॉर्म भरण्यापुरतेच मर्यादित राहत असल्याचे दिसून येत आहे. केवळ नेत्रदान, त्वचादान आणि किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सध्या कोल्हापुरात सुरू असून, अजून कोल्हापुरात प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपण झालेले नाही.
अवयवदान चळवळीला यश येण्यासाठी २४ तास यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक आहे. कोल्हापुरात सध्या अवयवदान चळवळ केवळ नेत्रदान, त्वचादान आणि किडनीपुरतीच मर्यादित आहे. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात मुंबई, पुण्यानंतर कोल्हापूर मेडिकल हब होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आजही अनेक सुविधा नाहीत. त्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही देत अवयव दान चळवळीला बळकटी देऊया असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री राजेश क्षीरसागर यांनी केले.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा इंडियन मेडिकल असोसिएशन) व श्री.राजेश क्षीरसागर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अवयवदान दिनानिमित्त "करा अवयवदान.. मिळवा मान.."उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत अवयवदानाविषयी जनजागृती करण्याकरिता *झी नाट्य गौरवपुरस्कार विजेते अवयवदाना विषयी हृदयस्पर्शी नाटक "स्टार"* या नाट्यप्रयोगाचे "देवल क्लब, कोल्हापूर" येथे आयोजन करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर व देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर व देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांनी अवयवदानासाठी आवश्यक फॉर्म भरून अवयवदान चळवळीत सहभाग नोंदविला.
यावेळी डॉ अमोल कोडोलीकर , डॉ प्रविण नाईक, डॉ शितल देसाई, डॉ अरुण धुमाळे, डॉ स्नेहलदत्त खाडे, डॉ राजेंद्र वायचळ, डॉ मानली मिठारी, डॉ दिलीप शाह, डॉ विश्वनाथ मगदूम, डॉ राधिका जोशी, डॉ स्मिता कोडोलीकर, डॉ सूर्यकांत मस्कर, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अनेक डॉक्टर्स सभासद उपस्थित होते.
Comments
Post a Comment