मंडपासाठी खड्डे न पाडणाऱ्या मंडळांना खड्डा पावतीतून सूट - आप च्या मागणीला यश
कोल्हापूर १ सिटी न्यूज नेटवर्क
सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अनेक मंडळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मंडप टाकून बाप्पाची प्रतिष्ठापणा केली जाते.
यासाठी जे मंडप उभारले जातात त्यांच्या परवानगी देताना महापालिका मंडळांकडून खड्डा पावती घेत होती. जे मंडळ खड्डा न खोदता मंडप उभारत होते त्यांनाही या पावतीचा भुर्दंड लागत होता.
या धोरणाचा विरोध करत आम आदमी पार्टीने जी मंडळे न खड्डा पाडता मंडप उभारणी करतील त्यांना खड्डा पावती आकारू नये अशी मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती.
यावर महापालिकेने खड्डे न पाडणाऱ्या मंडळांना खड्डे पावती न आकारण्याचा निर्णय घेतला. शंभर रुपये प्रति शंभर चौरस फूट इतके नाममात्र जागा भाडे आकारून परवानगी देण्यात यावी असे निर्देश शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सर्व विभागीय कार्यालयांना दिले.
त्यामुळे ज्या मंडळांनी खड्डा न पाडता मांडव उभा केलेला आहे त्यांनी खड्डा पावती भरू नये असे आवाहन आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केले आहे.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, प्रसाद सुतार, मयूर भोसले आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment