कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रसिध्द आर्कि.शिरीष बेरी यांची कार्यशाळा
कोल्हापूर २ सिटी न्यूज नेटवर्क
: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर यांचेवतीने गुरूवार दि.०५ सप्टेंबर २०२४ रोजी आर्कि.शिरीष बेरी यांची “माझे जीवन मुल्यांना प्रतिसाद” (Responding to my life values) या विषयावर कार्यशाळा आयोजित करणेत आली आहे. ही कार्यशाळा संस्थेचे शिवाजी पेठ येथील सभागृहमध्ये सकाळी ९ ते ४ यावेळेत होणार आहे. मुळचे कोल्हापूरचे असणारे आर्कि.शिरीष बेरी हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे आर्किटेक्ट असून त्यांना आता पर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी काही पुरस्कार म्हणजे दोनवेळा आर्केशिया सुवर्णपदक, हॉल ऑफ फेम पुरस्कार, ग्रेट मास्टर अवॉर्ड, बाबुराव म्हात्रे सुवर्णपदक इत्यादी आहेत.
ही कार्यशाळा दोन सत्रांमध्ये आयोजित केली आहे. पहिल्या सत्रामध्ये आर्कि.शिरीष बेरी यांच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून कार्यशाळेच्या विषयानुरूप सादरीकरण करून विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतील. त्यामध्ये प्रतिथयश आर्किटेक्ट आपले विविध प्रोजेक्टस डिझाईन करताना कशा प्रकारची विचारधारा अवलंबितो व सध्याच्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्या घटकांचा विचार करून प्रोजेक्ट डिझाईन करावेत याबद्दलची माहिती मिळणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये कॉलेजमधील तृतीय, चतुर्थ व अंतिम वर्षातील डिझाईन या विषयाचे काम बघून त्यावर आपले मत मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
या कार्यशाळेचा शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या इतर आर्किटेक्चर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य श्री. चिदंबर दुदगीकर यांनी केले आहे. तसेच यासाठी संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Comments
Post a Comment