नवीन जागतिक व्यवस्था घडवण्यात भारताची महत्वाची भूमिका - ईशा अंबानी

 नवीन जागतिक व्यवस्था घडवण्यात भारताची महत्वाची भूमिका - ईशा अंबानी



न्यूयॉर्क 26 सिटी न्यूज नेटवर्क 

न्यूयॉर्कमध्ये ‘भारत दिवस @ यूएनजीए सप्ताह ’ दरम्यान भारताच्या ग्लोबल साऊथचे नेतृत्व करणाऱ्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी जागतिक विकासाच्या अजेंडामध्ये भारताच्या नेतृत्वाची स्पष्टता मांडली. ‘टायगर्स टेल: क्राफ्टिंग ए न्यू डेव्हलपमेंट पॅराडाइम’ नावाच्या या चर्चासत्रामध्ये परराष्ट्र मंत्री यांच्यासह रिलायन्स फाउंडेशनच्या संचालक ईशा अंबानी, गुयाना देशाचे परराष्ट्र मंत्री ह्यूग हिल्टन टॉड, डीपी वर्ल्डचे ग्रुप चेअरमन सुलतान अहमद बिन सुलेयम आणि संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी भाग घेतला.


रिलायन्स फाउंडेशन, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओआरएफ) आणि भारतातील संयुक्त राष्ट्र कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात उद्घाटन भाषण देताना *रिलायन्स फाउंडेशनच्या संचालक ईशा अंबानी* म्हणाल्या, “जगभरातील नेते समान विकासावर चर्चा करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये एकत्र आले आहेत, यावरून हे स्पष्ट होते की आपले जग वेगाने बदलत आहे. विशेषत: भारत नवीन जागतिक व्यवस्था घडवताना योग्य पावले उचलत आहे. पण हा क्षण केवळ बदलाबद्दल नाही - तर एकत्र येऊन चांगले भविष्य घडवण्याबद्दल आहे, विशेषतः तरुणांसाठी. आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत, परंतु एकत्र काम करूनच आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो."


भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की ग्लोबल साऊथचे नेतृत्व आता एक वास्तव बनले आहे. त्यांनी असेही म्हटले की संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताची भूमिका एक मोठ्या मनाच्या राष्ट्राच्या रूपात स्वीकारली गेली आहे, आणि अशा राष्ट्राच्या रूपात, ज्याने ग्लोबल साऊथला पुन्हा चर्चेत आणले आहे. त्यांनी हे देखील नमूद केले की आपल्याला पाहणे गरजेचे आहे की आपण तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण कसे करतो."


रिलायन्स फाउंडेशन, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आणि भारतातील संयुक्त राष्ट्र कार्यालय यांनी संयुक्तपणे “द नेक्स्ट फ्रंटियर: चार्टिंग द कॉन्टूर्स ऑफ द पोस्ट-2030 डेव्हलपमेंट अजेंडा” या प्रकाशनाचे विमोचन या कार्यक्रमादरम्यान केले. या प्रकाशनात जागतिक तज्ञांचे 27 निबंध संग्रहित आहेत.

Comments