कोल्हापूर विभागाच्या दिव्या पाटील, ईश्वरी जगदाळे, विक्रमादित्य चव्हाण व दिशा पाटील यांची शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

 कोल्हापूर विभागाच्या दिव्या पाटील, ईश्वरी जगदाळे, विक्रमादित्य चव्हाण व दिशा पाटील यांची शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड




 कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क 

गुरुगोविंद सिंग, क्रीडा संकुल, नांदेड येथे नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या 14, 17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या शालेय राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा मोठा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतून कोल्हापूर विभागाच्या दिव्या पाटील, ईश्वरी जगदाळे, विक्रमादित्य चव्हाण व दिशा पाटील यांची निवड राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे.

मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर  व लातूर या आठ विभागातून निवड झालेले एकूण 240 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते यापैकी जवळजवळ 146 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त होते. 14, 17 व 19 वर्षाखालील मुला-मुलींच्या प्रत्येक गटात प्रत्येक विभागाचे निवड झालेले  पाच याप्रमाणे 40 बुद्धिबळपटू होते. प्रत्येक गटातील स्पर्धा स्विस लीग पद्धतीने क्लासिकल बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण सहा फेऱ्यात घेण्यात आली.

 चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाच्या विक्रमादित्य चव्हाण ने सहापैकी साडे चार गुण करून तृतीय स्थान पटकाविले.

 सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाच्या दिव्या पाटील ने सहा पैकी पाच गुण करत अजिंक्यपद पटकाविले तर दिव्याची जुळी बहिण दिशा पाटीलने साडेचार गुणासह पाचवे स्थान मिळविले.

 एकोणवीस वर्षाखालील मुलींच्या गटात कोल्हापूर विभागाच्या ईश्वरी जगदाळेने सहा पैकी पाच गुण घेत अजिंक्यपद पटकाविले.

प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाची निवड राष्ट्रीय शालेय  बुद्धिबळ स्पर्धेसाठी होते. त्यामुळे कोल्हापूर विभागातील दिव्या पाटील ( इ.10 वी, जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल, जयसिंगपूर), ईश्वरी जगदाळे  (इ. 11 वी सांगली हायस्कूल व व्ही एन ज्युनियर कॉलेज, सांगली) विक्रमादित्य चव्हाण ( इ.8 वी, शांथोम स्कूल अंकली, सांगली ) व दिशा पाटील (इ. 10 वी, जयप्रभा इंग्लिश मेडियम स्कूल,जयसिंगपूर ) या चौघांची निवड राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे. 14 वर्षाखालील मुला मुलींची शालेय राष्ट्रीय स्पर्धा नांदेड येथेच 21 ते 24 जानेवारी दरम्यान  होणार आहेत.  सतरा वर्षाखालील मुला-मुलींची राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा मध्यप्रदेशातील नर्मदापुरम येथे दिनांक 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. तर एकोणवीस वर्षाखालील मुला मुलींची शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे 18 ते 22 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. असे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी पत्रकारद्वारे कळविले आहे.

Comments