समिधा प्रतिष्ठान च्या वतीने सज्जनशक्ती जागरण परिषद
कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापुरात वाढत चाललेला दुर्जन शक्तीचा प्रभाव आणि त्यामुळे होणारी कोल्हापूरची दुर्दशा थांबविण्यासाठी आणि कोल्हापुरातल्या सज्जन शक्तीला एकत्रित करण्यासाठी समिधा प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापूर सज्जनशक्ती जागरण परिषद आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष अजित ठाणेकर यांनी पत्रकार द्वारे दिली आहे.
गेल्या काही वर्षात कोल्हापूर सर्वार्थाने मागे पडत चालले आहे. नागरी सुविधांचा विकासासोबतच शहरातील तरुणाईची वाढती व्यसनाधीनता, धार्मिक उत्सवातील गैरप्रकार, वाढत चाललेले सामाजिक अध:पतन आणि वाढती गुन्हेगारी हे शहरांमधील दुर्जन शक्तीचा वाढत चाललेला प्रभाव दर्शविते. या सर्व गोष्टींचा सामान्य माणसाला त्रास होत असला तरी त्याविरोधात काही करण्याची त्यांची मानसिकता नसते. त्यामुळे समाजात चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे प्राबल्य वाढत चालले आहे. हे प्राबल्य कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणून कोल्हापूर सज्जनशक्ती जागरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी होणाऱ्या या परिषदेत ह.भ. प. सुहास लिमये ये प्रमुख मार्गदर्शन करणार असून परिषदेस दैवज्ञ बोर्डिंग चे माजी अध्यक्ष एकनाथ चोडणकर, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष विकास सांगावाकर, प्रख्यात वैधानिक लेखापाल सतीश डकरे, बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष प्रशांत देसाई, उद्योजक अभय देशपांडे आणि डॉ. रामचन्द्र लिमये यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोल्हापूर चे भले व्हावे असा विचार करणाऱ्या सर्व कोल्हापूरकर नागरिकांनी या परिषदेस उपस्थित रहावे असे आवाहन अजित ठाणेकर यांनी केले आहे.

Comments
Post a Comment