टिप्परचालक कंत्राटात दिड कोटींचा ढपला - आप चा आरोप
कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क
शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्परवर चालक पुरवठा करण्यासाठी सहा ठेकेदारांचे पॅनल महापालिकेने नियुक्त केले आहे. प्रत्येकी 43 चालकांचे पॅनल असून एकूण 254 चालक या ठेकेदारांनी पुरवायचे आहेत. नवीन 30 टिप्पर डिसेंबर महिन्यात आले, त्याआधी एकूण 169 टिप्पर होते. परंतु इंजिन काम, टायर अभावी नादुरुस्त टिप्पर प्रभागात जाऊ शकत नव्हते. त्यामुळे फक्त 123 ते 128 टिप्पर मधूनच रोज कचरा उठाव केला जायचा. असे असूनही खोटी हजेरी मांडून सर्व 254 चालकांचा पगार कंत्राटदारांनी महापालिकेकडून उचलला आहे. या ठेकेदारांनी काही महापालिका कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पाच महिन्यात दिड कोटीहुन अधिक रकमेचा ढपला महापालिकेत पाडला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
रक्षक सिक्युरिटी सर्विसेस अँड सिस्टम प्रा. लि, साई एजन्सीज, व्हि डी के फॅसिलिटी सर्विसेस प्रा. लि, सिद्धिविनायक इंटरप्राईजेस, एच एस सर्विसेस प्रोव्हायडर, सक्षम फॅसिलिटी सर्विसेस प्रा. लि या कंपन्याना टेंडर मिळाले. या टेंडर मधील अटी शर्ती नुसार प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला सर्व चालकांचे हजेरी मस्टर, बँक स्टेटमेंट, पी एफ व ईएसआयसी चलन महापालिकेने तपासायचे आहे. त्यानंतरच कंत्राटदारांची बिले काढायची आहेत. पण हे न तपासताच अधिकाऱ्यांनी बिले काढली आहेत. एकूण 254 चालकांचे कंत्राट असताना केवळ 180 चालक भरून त्यांना डबल शिफ्ट करण्यास भाग पाडण्यात येत आहे. डबल शिफ्ट करणाऱ्या चालकाला दिडपट पगार देणे बंधनकारक असताना ते दिले जात नाहीत. ठेका 254 चालकांचा आहे. डबल शिफ्ट मध्ये चालक देणे अपेक्षित नाहीत. त्यामुळे पुरवण्यास असक्षम ठरल्यास दिवसाला 900 इतका दंड महापालिकेने कंत्राटदाराकडून वसुल करावा अशी मागणी आप ने केली.
किमान वेतनाप्रमाणे तसेच वेळेवर पगार न देणे, बायोमेट्रिक यंत्रणा लावण्यास टाळाटाळ करणे, खोटे हजेरी तयार करून महापालिकेला फसवणे, टेंडर अटी शर्तीचा भंग करणे यासारखी गंभीर कृत्ये केल्याने या सर्व ठेकेदारांचा ठेका रद्द करून यांची चौकशी लावावी, तसेच खोटी बिले दाखवून मिळवलेले पैसे वसुल करण्यात यावेत, अन्यथा आंदोलन करू असा इशारा आप चे प्रदेश संघटन सचिव सचिव संदीप देसाई यांनी दिला.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सुरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, समीर लतीफ, प्रसाद सुतार, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयुर भोसले, अमरसिंह दळवी, उमेश वडर, मनोहर नाटकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment