निसर्गाचे संवादक बना: डॉ. जगन्नाथ पाटील
२९ जानेवारी हा दिवस पृथ्वी संरक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प
कोल्हापूर (तिटवे) २९ सिटी न्यूज नेटवर्क
सारे जग सध्या पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात आहे.शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी ही देशाची पुढची पिढी आहे. या पिढीने निसर्गाच्या संवर्धनासाठी संवादक बनून काम करणे गरजेचे आहे. जगात मोठ्या प्रमाणात पर्यावरनाच ऱ्हास सुरु असून हे वेळीच थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सर्व विद्यार्थिनींनी काही झाडे लावल्यास आणि पर्यावरण विषयक जागृती चे काम समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवल्यास येत्या काही वर्षांमध्ये आपण लाखो झाडे निर्माण करू शकू, ज्यातून तापमान वाढ आणि इतर गोष्टींना आळा बसेल, असे मत जागतिक शिक्षणतज्ञ आणि शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केले. सोबतच २९ जानेवारी हा दिवस ‘पृथ्वी संरक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला.
मागील सलग तीन वर्षे सर्वाधिक तापमानाची वर्षे म्हणून जगाच्या इतिहासात नोंदली गेली.. गेल्या तीन दशकात समुद्र आणि जमिनीवरील जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे.. पॅरिस कराराची अंमलबजावणी सर्व देशांनी आणि समाज घटकांनी गांभीर्याने न केल्यास येत्या काही दशकात मानव प्रजाती न बघतो न भविष्यती अशा प्रलयास सामोरी जाऊ शकते याची जाणीव प्रत्येक व्यक्ती संस्था आणि धोरणकर्ते यांना करून देणे गरजेचे आहे. ही जबाबदारी नवी पिढी घेऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या.
या वेळी प्रत्येक विद्यार्थिनीला रोप भेट देण्यात आले. ते रोप प्रत्यकाने आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये लावण्याचा संकल्प केला. यासोबतच अशी शेकडो झाडे येत्या काळामध्ये लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. तसेच ‘धरती मातेची सुरक्षा आणि संवर्धन’ याची शपथ घेतली. गेल्या पाच वर्षात शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने 25000 हून अधिक झाडे लावून जोपासली आहेत.
या वेळी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर, शहीद सिताराम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या प्रा. स्नेहल माळी, शहीद सिताराम पाटील कॉलेज ऑफ पी. जी. च्या प्राचार्या प्रा. सिद्धता गौड, शहीद सिताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या मनाली भंडारी, शहीद पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शिल्पा अरबुने, यांच्यासह उपप्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment