पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्यावा : एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांचे आवाहन

 पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्यावा : एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांचे आवाहन



कोल्हापूर, २८ सिटी न्यूज नेटवर्क 

 प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून या योजनेकरीता राष्ट्रीयकृत बँकांही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. राज्यातील सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांनी आज (दि. 2८) कोल्हापूर परिमंडल कार्यालयातील घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे उपस्थित होते. 



कोल्हापूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’, प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजना व इतर प्रमुख कामांचा आढावा घेण्यासाठी नीता केळकर यांनी कोल्हापूर येथे बैठक घेतली. तत्पूर्वी ग्राहक संघटना व उद्योजकांच्या समस्याही जाणून घेतल्या व त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. याप्रसंगी नीता केळकर यांनी धोरणात्मक प्रश्नांचा मुख्यालय व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासनही ग्राहक प्रतिनिधींना दिले. 


याप्रसंगी नीता केळकर म्हणाल्या, ‘शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सौर प्रकल्पांना वेग दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १७० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे काम सुरु आहे. मागेल त्या शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानातून सौरपंप दिले जात आहेत. तर घरगुती ग्राहकांसाठी असलेल्या प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेसाठी 1 किलोवॅटला 30 हजार, 2 किलोवॅटला 60 हजार तर 3 किलोवॅट किंवा त्यापुढील प्रकल्पासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान मिळते. करवीर तालुक्यातील शेळकेवाडी गावाची निवड सौरग्राम योजनेत करण्यात आली असून येथील ११० पैकी १०० ग्राहक छतावर सौर ऊर्जा निर्मिती करत आहेत. तसेच अद्यावत असे नवीन स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये गैरसमज असून काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना दिवसा स्वस्त विजेचा लाभ घेणे शक्य होणार आहे, असे मत नीता केळकर यांनी व्यक्त केले.  


बैठकीस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईचे रमेश आरवाडे, भाजपा उद्योग आघाडीचे शरद नलवडे, जितूभाई गांधी, प्रकाश सरनाईक, अभिजित धवन, गायत्री राऊत, ग्राहक व उद्योजक प्रतिनिधी यांचेसह जिल्ह्यातील सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

  


Comments