श्री अंबाबाई मंदिरातील मनकर्णिका कुंडाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : समस्त हिंदू संघटनेची मागणी
कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क
श्री अंबाबाई मंदिराच्या परिसरात असलेले मनकर्णिका कुंड खुले होण्यासाठी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने पत्रकार परिषद, निवेदन, आंदोलन याद्वारे आवाज उठवला होता. अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे अत्यंत पवित्र अशा या या कुंडावर शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते. देवी भक्तांच्या उद्रेकातून या शौचालयाचे अनधिकृत बांधकाम जून २०१६ मध्ये पाडण्यात आले. यानंतर वर्ष २०२१ मध्ये हे कुंड खुले करण्याचे काम चालू करण्यात आले. ४ वर्षांनंतरही या कुंडाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. तरी पुढील ३ महिन्यात कुंडाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी निवेदनाद्वारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे केली.
कुंडाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाने पहाणी केली. त्यानंतर ही मागणी करण्यात आली. याच समवेत शिष्टमंडळाने श्री महालक्ष्मी मंदिर आणि देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अन्य प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली.
निवेदन स्वीकारल्यावर शिवराज नाईकवाडे म्हणाले, ‘‘मनकर्णिका कुंडाच्या सुशोभिकरणाचे काम आम्ही गतीने करत असून हे काम ३ महिन्यात आम्ही पूर्ण करू, तसेच भाविकांना चांगल्या सुविधा देऊ.’’
‘मनकर्णिका कुंड’ हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मी शक्तीपिठावर असून लक्षावधी भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. करवीर महात्म्यामध्ये या कुंडाचे वर्णन आले आहे. अगस्ती ऋषी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केले आहे. पूर्वी या तिर्थातील पवित्र पाणी श्री महालक्ष्मी देवीच्या अभिषेकासाठी वापरले जात असे. तरी हे कुंड लवकरात लवकर खुले करून येणार्या भाविकांनी त्याची पूर्ण माहिती होण्यासाठी मनकर्णिका कुंडांवर त्यांचे धार्मिक महत्व दर्शवणारे माहितीचे फलक आणि त्याची छायाचित्रे लावावीत, अशीही मागणी या प्रसंगी करण्यात आली.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट, श्री. शिवानंद स्वामी, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री. अभिजित पाटील, हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सर्वश्री आनंदराव पवळ, अमर जाधव, शरद माळी, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव उपस्थित होते.
Comments
Post a Comment